पंजाब- सबमर्सिबल पंप्सच्या मृत्यू शय्येवर

Submitted by Hindi on Tue, 03/06/2018 - 12:41
Source
जल संवाद, जलोपासना, दिवाळी 2017

पाच नद्यांच्या परिसराला पंजाब हे नाव दिले गेले. आज त्या परिसराला त्या नद्यांच्या नावाने मिऴालेली ओळख ही मागासलेपणाची ठरेल. आज पंजाबची माती, पंजाबचे पशूधन, पंजाबचे पाणी, पंजाबचे पक्षी ही पंजाबची ओळख पुसट होत चालली आहे. ऋषी, गुरु,संत यांनी आपल्या लिखाणात पंजाबचे गुणगान, लोकगीतांमधून वर्णन केलेली पंजाबची सुबत्ता या आता निव्वळ पुस्तकी परंपरा शिल्लक आहेत. आजचे विकास पुरुष मात्र या उज्वल परंपरा असलेल्या पंजाबला लंडन, पॅरिस बनवायला उत्सूक झाले आहेत.

या देशातील सर्व धर्म स्थळे, धर्म, जाती, संप्रदाय पाण्याशिवाय अपूर्ण समजले जात. पंजाबमधील हजारो गुरुद्वारांशी अमृतसर (अमृताचा तलाव) शी नाते जोडले गेले आहे. या हरीत क्रांतीच्या भागदौडीत सुद्धा कित्येक धार्मिक स्थळांचे नाव पाण्याशी जोडले गेले आहे. जसे, खूहीसर, कुआंसर इ.इ. पण आज मात्र पाण्याच्या या परंपराचा नाश करण्यासाठी याच विविध पंथांच्या धर्मस्थळांनी पुढाकार घेतलेला दिसून येत आहे. काही धर्मस्थळे सोडली तर बहुतांश धर्मसंस्थांनी परिसरातील तलाव, विहीरी बुजवून त्याचे निवासी प्लॅट्समध्ये रुपांतर केलेले दिसून येते. याच दुकानदारीमुळे परमात्म्याचे नावच पुसले जाते की काय अशी भिती वाटायला लागली आहे. या सर्व व्यवहारात पाण्याला सुद्धा गुदमरायला लागले आहे. पंजाब...पंज आब...पांच पाऩी....पांच नदीया या शब्दातील रसच निघून जात आहे.

पंजाबमधून वाहणार्‍या बहुतांश नद्या त्यांची जुनी ओळख विसरुन फक्त पावसाळ्यात वाहणार्‍या नद्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. सतलज नदीच्या जयंती, सिस्वा आणि बुदकी या तीन उपनद्या लुप्त झाल्या आहेत. जयंती नदी शिवालिक पहाडांतून उगम पावते. २० वर्षांपूवी पाण्याने लोतपोत भरलेली ही नदी आज मात्र निव्वळ हातावरील रेषेसारखी एक निव्वळ रेघ राहिली आहे. नद्यांच्या किनार्‍यांवर होणारे बेकायदा बांधकाम त्यांचे अस्तीत्वच मिटवू पाहात आहे.

सुंदर परंपरा मागे पडून त्यांची जागा नळ, नंतर नलकूप आणि आता सबमर्सिबल पंप यांनी घेतली आहे. घरोघरी आता सबमर्सिबल पंपांचे जाळे निर्माण झाले आहे. एवढेच काय तर विवाहाच्या मामल्यात एखाद्या कुटुंबाची प्रतिष्ठा त्याचेजवळ असलेल्या सबमर्सिबल पंपाच्या संख्येवर अवलंबून राहायला लागली आहे. एखाद्या घरी सबमर्सिबल पंप दिसला नाही तर तो तुमचे घरी का नाही असे विचारायलाही लोक कमी करीत नाहीत.

या भूजल उपशाचा परिणाम म्हणून या भागात दरवर्षी भूजलपातळी २० सेंटीमीटरने कमी होत आहे. भूजलाची पातळी घसरण्यात पंजाबचा देशात पहिला क्रमांक लागतो. पंजाबच्या नंतर हरयाणा, राजस्थान व तामिलनाडू यांचा क्रमांक लागतो. ही गंभीर परिस्थिती मोजण्याचे आणखी एक साधन म्हणजे अतिशोषित प्रभागांची संख्या. एकूण प्रभागांपैकी ११८ प्रभाग हे डार्क झोनमध्ये समाविष्ट आहेत. त्यापैकी तर ६२ प्रभाग हे अति शोषित प्रभागात मोडतात. मान्सूनपूर्व काळात या भागातला भूजलस्तर जवळपास ४ मीटरने खाली चालला जातो. संगरुर, अहमदगढ, पखोवाल, जगराव, धूरी, बरनाला, सुनाद, अमृतसर, फरीदकोट, लरधियाना, फतेहगढ साहिब, पटियाला, भटिंडा, पट्टी, वेगका, तरनतारन, खंडूर साहिब, जंडियाला, मूरमहल, जलंदर (पूर्व), बंगा, भोगपूर, आदमपूर, नकोदर, शाहकोट, फिल्लोर, गोराया, समराला, माभा, समाना, राजपूरा, सरहिंद, मोगा, रामपुराफूल (पूर्व) या गावात उन्हाळ्याच्या दिवसात नळामधून आवाजाशिवाय काहीही येत नाही. दोआब क्षेत्र तर या भागातील सर्वात उपजाऊ क्षेत्र मानले जाते. गेल्या १५-२० वषार्ंपासून इथे खाली गेलेली भूजल पातळी बघून तज्ञमंडळी हा भाग उजाड बनण्याची शक्यता बोलून दाखवतात.

पंजाबच्या भूमीपुत्रांनी हरीत क्रांतीचे लाभ मोठ्या प्रमाणावर उपभोगले पण त्या मागील होणार्‍या नुकसानाबाबत मात्र ते विशेष गंभीर दिसत नाहीत. त्यांचे पाणी, त्यांची माती, त्यांची शक्ती, त्यांचे प्रगल्भ जीवन, त्यांचे लोकसाहित्य, मृत व्यक्तींना जीवित करणारे त्यांचे संगीत, एवढेच नव्हे तर त्यांचे अनमोल स्वास्थ्य या सर्वांचे नुकसान ते उघड्या डोळ्यांनी बघत राहिले. निसर्गाशी हरलेल्या लढाईनंतर तिथे नशेचा महापूर आलेला आहे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दलदलीत पंजाब रुतून बसलेला आहे. यामुळेच इथला शेतकरी आता दारिद्य्र रेषेच्या खाली सरकत चालला आहे. देशात होणार्‍यया शेतकर्‍ययांच्या आत्महत्यातसुद्धा पंजाब आता अग्रेसर बनत आहे. भागातील तरुण पांढरे कपडे घालून हिंडायला लागल्यामुळे परप्रांतीय मजूरांवर विसंबून राहण्याची पाळी आता राज्यावर आली आहे.

इतके होवून सुद्धा देशाचे धोरणकर्ते पंजाबचे विकासाचे मॉडेल इतर राज्यांवर लादण्याच्या विचारात आहेत याचे आश्‍चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. पंजाबला आपल्या गव्हाच्या पिकाबद्दल खूप अभिमान होता. पण भाताच्या पिकानंतर लागवडीखाली आलेला गहू गल्लीतील कुत्रीसुद्धा खाण्याचे नाकारतात. रस्त्यावर फेकलेल्या पोळ्यांचे तुकडे कुत्री खात नाहीत तसेच गच्चीवर ठेवलेल्या तुकड्यांकडे पक्षी सुद्धा ढुंकून पाहात नाहीत. अशी हलाखीची परिस्थिती असतांना कृषी तज्ञ मात्र मशरुम व फुलांची शेती करण्याचे सल्ले देत आहेत.

वर वर्णिलेल्या परिस्थितीमुळे पंजाबमधील ७५ टक्के शेतक-यांची आर्थिक स्थिती बिकट बनलेली आहे. जवळपास ३७ टक्के शेतकर्‍यांची व दूध उत्पादकांची आमदानी सामान्य शेतमजुरांपेक्षांही कमी झाली आहे. प्लॉट्स बनविण्याच्या नादात तलाव बुजवून टाकल्यामुळे पाळीव जनावरांच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणार्‍या पाण्याच्या उपशासाठी होणारा वीजखर्चच अव्वाच्यासव्वा वाढलेला आहे.

१९८४ नंतर जमिनीतून चार ते पाच मीटर पाणी उपसा केल्यानंतर खारट व नायट्रेटयुक्त पाणी यावयास लागले आहे. ज्या ठिकाणी वाहनांवर २० रुपयांचे प्रदूषण मुक्तीचे प्रचाराचे कूपन लावणे सरकारसाठी पुरेसे ठरत होते त्याच ठिकाणी धानाचा भुसा जाळला जात असल्यामुळे भाताच्या हंगामात सामान्य माणसाला श्‍वास घेणेसुद्धा कठीण झाले आहे. बस, रेल्वे वा विमान प्रवास करतांना कोणीही कडे बघितले तर शेतात धानाचा भूसा जळत असतांना दिसतो. जनावरांसाठी चारा बारीक करण्याच्या यंत्रांत आज जनावरांच्याच्या चार्‍याबरोबर हाडांचा भुगापण मिळायला सुरवात झाली आहे. पांवटा साहिब भागातून येणार्‍या मऊ दगडांचा चुरा करुन त्याची माणसाच्या व जनावरांच्या अन्नात भेसळ मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. यामुळे माणसांना व जनावरांना होत असलेल्या आजारांबाबत कोणतीही आकडेवारी सरकारी व खाजगी पातळीवर उपलब्ध नाही.

या सर्व विकासाच्या खेळात शिक्षित धनाढ्य वर्ग सामान्य प्रश्‍नांपासून पूर्णपणे विलग झाला आहे. त्याला या समस्यांशी काही देणेघेणे नाही. त्याचे जीवनात जुन्या तलावांचे संवर्धन, विहीरींचे पुनरुजीवन आणि जुन्या झाडांचे संरक्षण या गोष्टींबद्दलची चर्चा मागासलेपणाचे लक्षण ठरते. याचे एक उत्कृष्ट उदाहरण देता येईल. संगरुर जिल्ह्यात मालेरकोटला नावाचे एक शांतीप्रिय शहर आहे. या शहराच्या मध्यवर्ती भागात एक विशाल सरोवर होते. त्याच्या चारही भागांना सुंदर छत्र्या होत्या. शहर विकासाच्या नावाखाली इंम्प्रूव्हमेंट ट्रस्टने हा तलाव बुजवण्याचा निर्णय घेतला. तो बुजवण्यासाठी तीन महिन्यात २५ लाख रुपये खर्च आला. चार छत्र्यापैकी तीन छत्र्या विकून एक लाख वीस हजार रुपये मिळाले पण चवथी छत्री मात्र आपल्या परिवाराच्या निधनानंतर वैराग्यासारखी उभी आहे. याच धर्तीवर या भागातील शेकडो तलाव विकासाच्या नावाखाली बुजवून टाकण्यात आले आहेत.

आज पंजाब सरकारजवळ मोकळ्या जमिनींचा कोणताही दस्तऐवज उपलब्ध नाही. सरकारी धोरणेही आजकाल राजनैतिक पक्षांच्या ध्येयधोरणांसारखी झाली आहेत. ती कोणापर्यंतही पोहोचत नाहीत. आज पूर्ण पंजाब पाताळातील पाण्यावर निर्भर आहे. पण हे पाताळातील पाणी संपले तर काय होईल याची कोणालाही चिंता नाही. तलाव हे भूमातेच्या नाभीप्रमाणे असतात. नाभी आपल्या जागेवर टिकून राहिली तरच शरीर संयमित राहते. नाभीच सरकली तर काय होते हे आपण सर्वजण जाणतो. एखाद्या माणसाच्या शरीरातील पाणी कमी झाले तर त्याला वाचवण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात, किती भागदौड करावी लागते हे आपल्याला माहित आहे. पण आज धरतीमातेतील पाणीच संपत चालले आहे याची कोणालाही तमा नाही.

आज पंजाब मध्ये १४ लाख सबमर्सिबल पंप दिनरात भूजल उपसत आहेत. राजकीय नेते, सामाजिक नेते, सर्वसामान्य शेतकरी यापैकी कोणीही पंजाबची भूमी सबमर्सिबल पंपाच्या शरशैय्येवर निपचित पडली आहे हे समजायलाच तयार नाही. भीष्म पितामहाजवळ एक इच्छा मरणाचे वरदान होते. धर्माची जीत व्हावी ही इच्छा होती. अंतीम निर्वाणासाठी काही सदशिष्य भोवती उभे होते. पंजाबच्या जनतेजवळ काय आहे?