पर्जन्यजल साठवण - खर्च आणि आर्थिक पैलू

Submitted by Hindi on Fri, 01/01/2016 - 09:15
Source
जल संवाद

जलवर्धिनी प्रतिष्ठानने आतापर्यंत पाणी साठवण्याच्या सुमारे 160 टाक्या बांधल्या असून, त्यांची साठवणक्षमता 20 हजार लिटरपर्यंत आहे. यातील बहुतांश टाक्या कोकणात बांधण्यात आल्या आहेत. एक हजार मि.मी पेक्षा जास्त पाऊस असलेल्या क्षेत्रात वरकस किंवा पडीक जमिनीवर फळबागा विकसित करण्यासाठी अशा प्रकारच्या टाक्या उपयोगी ठरू शकतात. पाणी साठवण्याच्या टाक्यांच्या काही प्रकारांची माहिती पुढे दिली आहे -

1. फेरोसिमेंट टाकी (जालगाव, ता. दापोली, जि. रत्नागिरी - मार्च 2015)10' - 0' व्यास आणि 4' - 0' उंची असलेली फेरोसिमेंटची टाकी राजाराम बापू घोरपडे यांच्या वाडीमध्ये बांधण्यात आली. सुमारे नऊ हजार लिटर पाणी साठवण्याची या टाकीची क्षमता आहे. 5' - 0' उंची आणि 12' - 0' व्यास एवढ्या आकाराच्या जोत्यावर मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात या टाकीचे बांधकाम करण्यात आले. घोरपडे यांच्या वाडीमध्ये आंबा आणि काजूच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यांच्याकडे पाण्याचा स्त्रोत आहे, मात्र पुरेशी साठवणूक क्षमता नव्हती. त्यामुळे त्यांच्या विनंतीवरून फेरोसिमेंटची टाकी बांधण्यात आली. जोत्याचे बांधकाम घोरपडे यांनी करून घेतले. तसेच मजूर आणि वाळूची व्यवस्था त्यांनी केली. आम्ही त्यांना सिमेंट, वेल्ड आणि चिकन मेश, तसेच स्टील पुरवले आणि कामाचे पर्यवेक्षणही केली.

आम्ही पुरवलेल्या साहित्याची किंमत -
सिमेंट - 12 पिशव्या - रू. 4380
स्टील - 57 किलो - रू. 3150
वेल्ड मेश - 4' - 0' X 50' - 0' - रू.2500
चिकन मेश - 3 रोल्स - रू. 1350
बाईंडिंग वायर - 3 किलो - रू. 240
अॅड मिक्शचर - 3 लिटर - रू. 450
कॉक कपलिंग आणि इतर - रू. 600
वाहतुक - रू. 550
एकूण - रू. 13220

श्री. घोरपडे यांनी केलेला खर्च
वाळू - 100 सीएफ - रू. 4000
1 मॅसन - तीन दिवस - रू. 1800
2 मजूर - तीन दिवस - रू. 1800
एकूण - रू. 7600

या ठिकाणी मालक श्री. घोरपडे यांना उंच जोते हवे होते. त्यामुळे साहित्य आणि मजूर यांचा खर्च 8000 रूपये झाला. एकूण 13,220 + 7600 + 8000 = 28800 रूपये एवढा खर्च झाला.

अ. नऊ हजार लिटरची फेरोसिमेंट टाकी बांधण्यासाठी आलेला खर्च 28 हजार 880 रूपये, त्यामुळे प्रति लिटरसाठी येणारा खर्च 28800 भागिले 9000 = रू. 3.20 प्रति लिटर.
ब. जलवर्धिनी प्रतिष्ठानचे श्री. खरे या कामाच्या पर्यवेक्षमासाठी चार दिवस उपस्थित होते. त्याचा दर लक्षात घेतल्यास एकूण खर्च 28800 + 4000 = 32880 रूपये एवढा होतो. त्यामुळे 32880 भागिले 9000 = रू. 3.64.

म्हणजेच सुमारे पावणेचार रूपये प्रति लिटर एवढा खर्च या कामासाठी आला. यामध्ये जोत्याचा खर्चही समाविष्ट आहे. कोकणातील शेतकरी नदीतील वाळू आणि मजुरांची व्यवस्था करू शकतात. त्यामुळे ते जोत्याचे बांधकाम करू शकतात. त्यामुळे येणारा खर्च वरच्या उदाहरणापेक्षा कमी होतो.

5' - 0' उंचीच्या जोत्यासाठी 8 हजार रूपये खर्च आला. साधारणत: जमिनीवर 1' - 6' एवढ्या उंचीचे जोते पुरेसे असते. त्यामुळे खर्च निश्चितच कमी होतो.

शेतकऱ्याने वाळू आणि मजूर यांची व्यवस्था केली, तर खर्च कमी होवू शकतो ( 3600 + 4000 = 7600 रू.) + जोत्याचा खर्च रू. 8000 = 15600 रूपये.

अशा स्थितीत 32880 - 15600 = 17220 भागिले 9000 = 1.91 रूपये. - म्हणजेच खर्च सुमारे दोन रूपये प्रति लिटर

2. नारळाचा काथ्या, सिमेंट वापरून तयार केलेली भूमिगत टाकी
नारळाचा काथ्या आणि सिमेंट यांचा वापर करून वांगणी येथे 2013 मध्ये पाच हजार लिटर क्षमतेची भूमिगत टाकी बांधण्यात आली. टाकीचा आकार वरच्या बाजूला तीन बाय तीन मीटर, खालच्या बाजूला एक बाय एक मीटर आणि खोली एक मीटर असा आहे, तर बाजूंचा उतार 1:1 असा आहे.

- खोदाई दोन दिवसांसाठी दोन मजूर - 1200 रू.
- सिमेंट सात पोती - 2520 रू.
- वाळू 100 सीएफटी 4000 रू.
- अॅडमिक्शचर एक लिटर 150 रू.
- मजूर एक मेसन आणि दोन मजूर दोन दिवस 2400 रू.
- पर्यवेक्षण दोन दिवस 2000 रू.
- नारळाचा काथ्या 12 चौ मी 750 रू.
- वरच्या बाजूसाठी विटा 500 रू.
- वाहतुक, अन्य खर्च 1000 रू.
- एकूण 14520 रू.

त्यामुळे प्रति लिटर खर्च
14520 भागिले 5000 = 2.90 रू.
शेतकऱ्याने मजूर, तसेच वाळू पुरवली, तर खर्च 6400 रूपयांनी (2400 + 4000) कमी होईल.
त्यामुळे प्रति लिटर खर्चही कमी होईल.
14520 - 6400 = 8120
8120 भागिले 5000 = 1.62 म्हणजेच सुमारे 1.75 रूपये प्रति लिटर खर्च

3. जिओमेम्ब्रेन वापरून तयार केलेली भूमिगत टाकी
मे 2013 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगावमधील एमकेएसएसएस येथे जिओमेम्ब्रेन वापरून भूमिगत टाकी तयार करण्यात आली. टाकीचा आकार 6.25 मी बाय 3 मीटर असा असून, खोली एक मीटर आहे. टाकीची साठवण क्षमता 19000 लिटर आहे.

खर्च - खोदाई - रू. 5000
- जिओमेम्ब्रेन - रू. 11020
- टाकीच्या तळाशी जिओमेम्ब्रेनच्या वर खाली माती पसरणे,
पर्यवेक्षण - रू. 1000
एकूण 17020 रू.
प्रति लिटर खर्च 17020 भागिले 19000 = 0.85 रूपये

म्हणजेच सुमारे एक रूपया प्रति लिटर
शेतकऱ्याने स्वत: खोदाई केली,तर टाकीचा खर्च पाच हजार रूपयांनी कमी होईल. त्यामुळे प्रति लिटर खर्च 12020 भागिले 19000 = 0.63 म्हणजेच सुमारे 0.75 रूपये एवढा येईल.

साठवण टाकीची क्षमता वाढत गेली, की प्रति लिटर खर्च कमी होत जातो.

श्री. उल्हास परांजपे - मो : 9820788061