पूररेषा व नागपूर

Submitted by Hindi on Thu, 12/17/2015 - 10:33
Source
जल संवाद

अती वेगाने वाढणाऱ्या नागरिकरणाने शहरातील मोकळ्या जागांवर अतिक्रमण होऊ लागले आहे. झोपडपट्ट्या आणि वसाहती उभ्या राहू लागल्या व नदी काठच्या मोकळ्या जागा संपुष्टात येऊ लागल्यात. यामुळे नद्यांना येणारे पुराचे पाणी नदी तीरावरील भागात घुसते व नदी किनाऱ्यावरील घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड होऊन वित्तहानी व जीवहानी होते.

अती वेगाने वाढणाऱ्या नागरिकरणाने शहरातील मोकळ्या जागांवर अतिक्रमण होऊ लागले आहे. झोपडपट्ट्या आणि वसाहती उभ्या राहू लागल्या व नदी काठच्या मोकळ्या जागा संपुष्टात येऊ लागल्यात. यामुळे नद्यांना येणारे पुराचे पाणी नदी तीरावरील भागात घुसते व नदी किनाऱ्यावरील घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड होऊन वित्तहानी व जीवहानी होते. पडझड झालेल्या घरांचा दुरूस्ती कार्यक्रम तसेच नदी पुरामुळे विस्थापित झालेल्या लोकांचे पुनर्वसन करणे महसूल विभागाला हाती घ्यावे लागते, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना नदीच्या निळी रेषा व लाल रेषा या पुररेषा आखून देण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदारी द्यावी लागते. पाटबंधारे विभागाचे अधिकारी नद्यांचे पूरक्षेत्र व संबंधित पूररेषा यांच्या आखणी विषयी तसेच पूर क्षेत्रातील जमिनीच्या वापराबाबत धोरण सुरक्षितता संहिते मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार कार्य करीत असतात.

पुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पूररेषेच्या आंत कोणतेही बांधकाम न होण्याच्या दृष्टीने पूररेषा आखणी करण्याबाबत, महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाने दिनांक 21 सप्टेंबर 1989 रोजी शासन परिपत्रक काढून निषिध्द क्षेत्र, निषेधक पूररेषा, नियंत्रित क्षेत्र व नियंत्रक पूररेषा कशा आखाव्यात याबाबत मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत.

निळी रेषा - निषिध्द क्षेत्र :


सरासरीने 25 वर्षांतून एकदा या वारंवारितने येणारा पूरविसर्ग वाहून नेण्यासाठी जे नदी पात्र व त्यालगतचे क्षेत्र आवश्यक आहे ते क्षेत्र निषिध्द क्षेत्र आहे व असा विसर्ग वाहून जाणारी पाणी पातळीची रेषा म्हणजेच निळी रेषा होय. अशा क्षेत्राचा उपयोग फक्त मोकळ्या जमिनीच्या स्वरूपात ठेवावे या ठिकाणी उद्याने, खेळाचे मैदाने अशासारख्या कामासाठीच केला जावा.

लालरेषा - नियंत्रीत क्षेत्र :


100 वर्षातून एकदा या वारंवारितेचा महत्तम पूर वाहून नेण्यासाठी ज्या वहन क्षेत्राची आवश्यकता आहे त्या क्षेत्रातून निषिध्द क्षेत्र वगळता उरणाऱ्या नदीचे दोन्ही तीरांवरील क्षेत्राला नियंत्रित क्षेत्र संबोधण्यात येते असा विसर्ग वाहून जाणारे पाणी पातळीच्या रेषा म्हणजेच लाल रेषा होय.

नियंत्रित क्षेत्रातील बांधकामाच्या तळमजल्याच्या जोत्याची पातळी सुरक्षित उंचीपर्यंत असावी की ज्यामुळे पूरपातळी नियंत्रित क्षेत्रात जास्त प्रमाणात चढावयाच्या आंत अशा इमारती मधील माणसे इमारत सोडून सुरक्षित ठिकाणी सहजतेने जाऊ शकतील. तसेच इमारतीचे बांधकाम अशा प्रकारचे असावे की जे क्वचित येऊ शकणाऱ्या पुरामुळे कोसळणार नाही.

अशा क्षेत्रातील इमारतीच्या वापराबाबत बंधने आहेत या क्षेत्रात येणारा संभाव्य पूर व तसेच पुरामुळे होणारी जीविताची हानी व मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी या क्षेत्रातील लोकांना, जनावरांना व वस्तूंना अल्पावधीची पूर्वसूचना मिळताच हे क्षेत्र तातडीने सोडून सुरक्षित स्थळी जाणे आवश्यक राहील.

या वर्षी नागपूरातील पूर :


नागपूरात दिनांक 15 जुलैला पहाटे आलेला पाऊस हा आक्राळ - विक्राळ होता. शहरात पहाटे 2.30 वाजता सुरू झाल्यानंतर सकाळी 8 पर्यंत तब्बल 145 मी.मी पाऊस कोसळला. मध्यप्रदेशातील कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव नागपूरसह संपूर्ण पूर्व विदर्भाने त्या दिवशी पहाटे अनुभवला. पहाटे दोनच्या सुमारास वादळी वारे सुरू झाले. 2.30 वाजता पासून दमदार पाऊस सुरू झाला. पहाटे 4 ते सकाळी 7 च्या दरम्यान पावसाचा जोर सर्वाधिक होता. सलग पाच तास शहरात अतिवृष्टी झाली.

नागपूर शहरातून दोन नद्या वाहतात, एक नाग नदी जी अंबाझरी तलावापासून सुरू होते व दुसरी पीवळी नदी जी गोरेवाडा तलावापासून सुरू होते. पीवळी नदी नाग नदीस नागपूर शहराच्या बाहेर मिळते. पीवळी नदी उत्तर नागपूरात वाहते तर नाग नदी पश्चिम व पूर्व नागपूरातून वाहते. अंबाझरी तलावापासून नाग नदी कॅनाल प्रमाणे बांधली आहे व दोन्ही बाजूने घरांचे बांधकाम झाले आहे. काठावर अंबाझरी लेआऊट, डागा लेआऊट, कार्पाेरेशन कॉलनी, शंकर नगर, रामदासपेठ, सिताबर्डी आहे. फुटाळा तलावाचा नाला भरतनगर, रविनगर, गोकुळपेठ, महाराजबाग येथून सिताबर्डी येथील संगम पुलाजवळ नागनदीस मिळतो. या फुटाळा नाल्यावर बर्डी येथील झाशी राणी चौकाजवळ स्लॅब टाकली असून त्यावर पेट्रोलपंप व दुकाने आहेत. नागनदी पुढे बर्डीवरून धंतोली, घाटरोड, शुक्रवारी, महाल करत पुढे जाते. पीवळी नदी गोरेवाडा तलावापासून झिंगाबाई टाकळी, जरीपटका आदि भागातून जाऊन नागनदी शहराच्या बाहेर मिळते.

वसाहती मधील बांधकामामुळे या नद्यांना मिळणारे नाले बुजविल्या गेले आहेत व त्यामुळे पाणी रस्त्यावरून उताराकडे वाहत जाते व नागनदी किंवा पीवळी नदीस मिळते त्यामुळे चौका चौकात पाणी साचते व नदीचे निचरा होईपर्यंत चौकातील रस्ते तुडूंब भरूनच रहातात. रस्त्यातील विभाजकामुळे पाणी अडते व ते विभाजकावरून वाहू लागते. कमी वेळात जास्त पाऊस झाला तर नदी नाल्यांची वहन क्षमता कमी झाल्यामुळे रस्त्यांवर पाणी साचते व निचरा होण्यास वेळ लागतो.

नदी नाल्याकाठच्या वसाहती धोक्यात आल्या. शहरातील निम्म्याहून अधिक वस्त्या जलमय झाल्या. दक्षिण, पश्चिम , दक्षिण व पूर्व नागपूरचे अनेक भाग पाण्याखाली गेले. काही वस्त्यांचा शहराशी संपर्क तुटला. पाऊस व त्यानंतर आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका दक्षिण नागपूरातील हुडकेश्वर, बेसा, घेगली या परिसराला बसला. तर सर्वच तलावाकाठची स्थिती भयावह होती. नाले, नद्या, गटारे तुडूंब भरले व वस्त्यांना तलावाचे स्वरूप आले. अनेक घरांत पाणी घुसून धान्य व कपडे ओले झाले.

31 जुलैला जोरदार पावसाने नागपूरकरांच्या जीवांचे पुन्हा एकदा पाणी पाणी केले. दुपारी 4 वाजता धो -धो पाऊस सुरू झाला. पावसाचा जोर सायंकाळी 7 वाजेपर्यंत होता. अवघ्या 3 तासात तब्बल 101 मी.मी पावसाची नोंद झाली. अनेक वस्त्या जलमय झाल्या, झोपड्या, घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले. सिताबर्डीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी अक्षरश: बोटींचा वापर करावा लागला. चौका चौकात गुडघाभर पाणी साचले. अनेक वहाने बंद पडली. या सर्वांचा परिणाम म्हणजे :

- मनीष नगर रेल्वे क्रॉसिंगच्या गार्डनजवळ दोन फूट पाणी होते तिथे अनेक वहाने बंद पडली.
- बजाज नगर ते शंकर नगर, व्हीएनआयटी ते एलएडी रस्ता बंद, व्हीआयपी रोड ते अलंकार चौक, पंचशील ते व्हेरायटी चौक रस्ता ठप्प.
- रामदासपेठ, विदर्भ साहित्य संघ इमारतीत छातीभर पाणी.
- सहकार नगर , शिवशक्ती लेआऊट, सोनेगाव परिसरात तलावाचे पाणी घुसले.
- विमानतळच्या भिंतीजवळील प्रतापनगर, प्रज्ञा लेआऊट, दाते लेआऊट पाण्याखाली.
- अजनी चौक ते पंचशील चौकात वाहतुकीची मोठी कोंडी झाली.
- अंबाझरी जवळील समतानगर, वर्मा लेआऊट, पोंढराबोडी, रामनगर वस्त्या पाण्यात.
- शहरातील नाग नदी शेजारच्या परिसराने पावसाचा मोठा फटका अनुभवला मात्र नदीचे पात्र स्वच्छ आणि खोल झाल्याने पाण्याचा प्रवाह शहराबाहेर नेण्यात मोलाची मदत झाली. हा प्रवाह रस्त्यांवर आला असता तर अधिक मोठ्या जलसंकटाला तोंड द्यावे लागले असते.

दुपारी 4 वाजेनंतर झालेल्या पावसाने शहराची आपतकालीन यंत्रणा पूर्णपणे ठप्प केली. एरवी पाण्यामुळे पूर्व दक्षिण नागपूरमध्ये हाहाकार उडतो. मात्र या पावसाने पॉश समजल्या जाणाऱ्या पश्चिम नागपूरची पुरती वाट लागली. सर्वच प्रमुख चौकामध्ये कुठे गुडघ्यापर्यंत तर कुठे कमरेपर्यंत पाणी साचल्याने नागरिकांनी पहिल्यांदाच अनेक तासांचे ट्राफिक जाम अनुभवले. वर्धा रोड, रामदासपेठ, कॅनालरोड, सेंट्रलबाझार रोड, शंकरनगर, व्हेयरायटी चौक, पंचशील चौक या भागांमध्ये पूर्णपणे ट्राफिक ठप्प झाला होता.

सायंकाळी सहानंतर कर्मचारी घराकडे जाऊ लागले तेव्हा चौकाचौकात त्यांना फक्त पाणीच दिसले. एव्हाना अनेक झोपड्या, घरांमध्ये पाणी शिरले होते, बेसमेंट मधील दुकाने अक्षरश: डुबली. सबमर्सिबल पंपसुध्दा काम करेनासे झाले. शहर बसेसच्या इंजनमध्ये पाणी घुसल्याने त्या बंद पडल्या. गाड्या, कारच्या इंजिनमध्ये पाणी घुसले, बर्डीवर तर कमरे इतके पाणी होते. मोरभवन परिसरात अडकलेल्या सुमारे साडेतीनशे नागरिकांना बोटीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले.

नागपूर प्रशासनाला पूररेषा आठवल्या :


नागपूर महानगरपालिकेच्या दिनांक 19 ऑगस्ट 2013 च्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी पूरहानी बाबत प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देतांना आयुक्त, मनपा यांनी सांगितले की नागनदीच्या पात्रापासून 9 मी. क्षेत्रात बांधकाम अवैद्य आहे. परंतु अंबाझरीपासून नाग नदीलगतचा संपूर्ण क्षेत्रात केवळ लहान अतिक्रमणच नव्हे तर वसाहती वसल्या आहेत. या वसाहती हटविल्यास त्यांच्या तेथील नागरिकांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे आता नाग नदीची पूररेषा निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणानंतर राज्य शासनाकडे पूररेषेत येणाऱ्या बांधकामाची माहिती पाठविली जाईल. पूररेषेतील बांधकाम पाडण्यात येणार असून तेथील नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.

पूर परिस्थिती येऊन हानी झाल्यानंतर उपाय योजना करण्यापेक्षा सर्वच शहरांत व गावांत निळी रेषा, लाल रेषा ( Blue zone, Red zone) आखून घ्याव्यात व त्यानुसार निषिध्द क्षेत्र व नियंत्रित क्षेत्रात पाळावयाच्या बाबींची काटेकोर अंमलबजावणी व्हावी म्हणजे पुरामुळे होणारी वित्तहानी व जीवहानी कमी होईल.

श्रीकांत डोईफोडे, नागपूर - मो : 9423408093