शहरी - ग्रामीण भागातील पाणीप्रश्न आणि संभाव्य उपाययोजना

Submitted by Hindi on Mon, 10/05/2015 - 16:42
Source
जल संवाद
नुकतीच वृत्तपत्रामध्ये ठळक बातमी होती की मराठवाड्यातील धरणात केवळ चाळीस टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. फेब्रुवारी महिन्यात जर ही परिस्थिती आहे तर पुढे एप्रिल मे मध्ये ग्रामीण भागातील पाणी प्रश्न किती भयावह परिस्थिती निर्माण करील याचा विचार करूनच अंगावर काटा उभा रहातो. अगोदरच मागील वर्षाच्या दुष्काळाच्या झळांचा चटका लोक अद्याप विसरले नाहीत आणि परत या वर्षी तसाच प्रसंग उद्भवणार या विचारानेच तोंडचे पाणी पळून जाण्याची वेळ आली आहे. दिवसेंदिवस ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न वरचेवर गंभीर रूप धारण करीत आहे.

जलसंपदा विभागाने जलसाठ्याची फेब्रुवारी - 2014 च्या तिसऱ्या आठवड्यात दिलेली आकडेवारी सर्वांचीच झोप उडविणारी आहे. जायकवाडी धरणात केवळ 19 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यातील तीन मोठी धरणे, म्हणजे, मांजरा, निम्नतेरणा आणि सीनाकोळेगाव ही उपयुक्त पाणी साठ्याच्या दृष्टीने निव्वळ कोरडी आहेत. तसेच मराठवाड्यात 75 मध्यम प्रकल्पांमध्ये 44 टक्के पाणी आहे, तर 718 लघुप्रकल्पात केवळ 35 टक्के पाणी आहे.

या शिवाय शहरांना होणारा पाणीपुरवठा पाहिला तर, नांदेड आणि औरंगाबाद दोन दिवसाआड, जालन्याला आणि परभणीला पाच दिवसांनी, हिंगोली, उस्मानाबाद आणि बीड मध्ये चार दिवसांनी पाणी पुरवठा सध्या होत आहे. लातुरमध्ये तर सहा दिवसाआड पाणी पुरवठा होतो आहे.

आता साधी गोष्ट आहे बघा, की पाऊस किती, कधी आणि कुठे पडावा हे फारसे आपल्या हातात नसते. परंतु जो काही पाऊस पडतो तो आपण साठवून ठेवला तर अडचणीच्या वेळी ही साठवणच कामाला येवू शकते.

पूर्वी एखाद्या लग्नकार्यात वारेमाप खर्च केला तर लोक म्हणतात की बघा हो बघा, यांनी कसा पाण्यासारखा पैसा खर्च केला लग्नात. म्हणजे याचा अर्थ असा की पाण्याला काही किंमतच नसते, पाणी अनाठायी अमाप, खर्च केले तरी चालते. म्हणून कादाचित पूर्वीच्या काळी ही म्हण प्रचलित झाली असावी. पण आत्ताचे काय ? आज पिण्यासाठी पाण्याची भयंकर टंचाई जाणवते आहे ना ? टँकर आल्यावर त्या भोवती लढाईच्या पवित्र्यातील माणसे आपण पहात आहोत ना ? एक बकेटभर पाण्यासाठी पैसे मोजायची आता आपल्यावर वेळ आली आहे ना ? तरीही आपणास या गोष्टीचा ना खंत ना खेद ! मला या ठिकाणी कविवर्य विठ्ठल वाघ यांच्या कवितेच्या दोन समर्पक ओळी आठवतात. त्या अशा की -

सारं कसं सामसूम, तरंग नाही तलावात
वड कलंडती असे कुठे गेले झंझावात


पाणी बचतीसाठी आता पुन्हा झंझावात निर्माण करण्याची वेळ आली आहे. पुन्हा रान उठवून हाकारे करण्याची वेळ आता आली आहे. ऊत्तिष्ठ, वरान्न प्राप्त बोधित या उक्ती प्रमाणे, उठा, जागे व्हा आणि आपल्याला जे जे जमेल तसे प्रयत्न प्रत्येकाने करणे आता गरजेचे झाले आहे. एकदा एक शिष्याने गुरूला विचारले की मला देवाचे दर्शन कधी होणार ? तेव्हा त्या गुरूने, शिष्याला नदीमध्ये नेले आणि त्याचे डोके धरून त्याला पाण्यात दाबून ठेवले. काही सेकंदात तो शिष्य हवेशिवाय तडफडू लागला आणि त्याने सर्वशक्तीनिशी गुरूच्या हाताला हिसडा देवून सुटका करून घेतली आणि तो पाण्याबाहेर डोके काढून जोरजोरात श्वास घेवू लागला. तेव्हा गुरूने त्याला सांगितले की बाबारे तुझे डोके पाण्यात असताना तुला सगळ्यात जास्त गरज कशाची होती ? शिष्य म्हणाला की मला सगळ्यात जास्त हवेची आवश्यकता होती. गुरू म्हणाले की जशी तुला पाण्यात असताना जितक्या तीव्रतेने हवेची गरज वाटली, तितक्याच तीव्रतेने तुला देवाचे दर्शन होण्याची गरज निर्माण होईल तेव्हाच तुझी इच्छा पूर्ण होईल. या बाबत एक सुविचार असा आहे की जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट अगदी मनातून करावीशी वाटते, तेव्हा ते प्राप्त करण्यासाठी या विश्वातील सर्व शक्ती तुमच्या सोबत तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी सदैव उभ्या असतात. हे सगळं आपल्याला कळतं पण वळत नाही. ते थोडेफार वळावे यासाठी मी काही सोप्या उपाययोजना आपल्याला सांगणार आहे. आपण म्हणाल की, तुम्ही ज्या उपाययोजना सांगणार आहात, त्या आम्हाला अगोदरच माहित आहेत. तुम्ही नवं असं काय सांगणार आहात ? याचं उत्तर असं आहे की मी नवं काही सांगणार नाही, पण आपण जे काही करता त्यामध्ये थोडेफार नाविन्य आणता येईल. म्हणजे कसं ? तर असं बघा -

1. म्हणजे प्रत्येकाने आपल्या घरावरील छतावर पडणाऱ्या पावसाचे पाणी उन्हाळ्यातून वाया न जावू देता छतावरील पावसाच्या पाण्याला पाईप लाईन करून एखाद्या टाकीमध्ये, हौदामध्ये किंवा बोअरमध्ये सोडायचे. अर्थात यामध्ये पीव्हीसी पाईपचा खर्च व फिल्टरका खर्च एकदा करावा लागेल, पण वर्षानुवर्षे हे कामास येते. आणि आपल्या कुंटुंबाला लागणाऱ्या पाण्याची गरज निश्चितपणे काही प्रमाणात सोडवण्यास उपयुक्त ठरेल. बघा, विचार करा, पटलं तर व्हय म्हणा.

2. विहिरींचे पुनर्भरण करायचे. म्हणजे शेतातल्या विहिरींचे पुनर्भरण केल्याने उन्हाळ्यातही पाणी टंचाई पूर्वी इतकी भासणार नाही.

3. गाव पातळीवर सर्वकष पाणलोट विकास कार्यक्रम राबवणे. यामध्ये लोकसहभागाची अत्यंत आवश्यकता आहे. कारण आभाळातून पावसाच्या रूपाने पडणारे पाणी हे एक सामुहिक संपत्ती साधन, म्हणजे कॉमन प्रॉपर्टी रिसोर्स, म्हणजेच सी.पी.आर आहे. थोडक्यात ह्यावर सर्व गावकऱ्यांचा, समाजाचा हक्क आहे. हे पाणी कोण्या एकाच्या मालकीचे नाही. तेव्हा सर्व गावकऱ्यांनी एकजुट करून पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम आपल्या गावात राबविण्यासाठी स्वत: पुढाकार घेतलाच पाहिजे. बघा, विचार करा, आपल्या आजच्या पिढीला जर पाण्याचे एवढे दुर्भिक्ष्य आहे, तर आपल्या पुढच्या पिढ्यांच्यासाठी जरा विचार करा. त्यांना आपण वारसा म्हणून, विरासत म्हणून काय मागे शिल्लक ठेवणार आहोत. आपल्या नातवंडाने, हो.... मेरे आजोबाने पाणलोट बनाया है, मेरी धनसंपत्ती है....

4. पाण्याचा अत्यंत काटकसरीने उपयोग वाढवणे. मग शहरी भागात असो किंवा ग्रामीण भागात शेतीसाठी असो. आपल्या मुला- मुलींचा चेहरा नजरेसमोर आणा आणि मग बघा की, आपणच कसे काटकसरीने पाण्याच्यावापरास सुरूवात करू. शेतीसाठी प्रवाही पध्दतीने वापर करतांना, तुषार - ठिबक सिंचनाचा वापर करावा असे मनात येते का बघा. आणि हो, अडचणी सांगू नका, की आहो ठिबक - तुषारला खर्च फार येतो हो ? कसं परवडणारआम्हाला ? तर मी तुम्हाला विचारतो की, गरीब परिस्थिती असलेल्या माणसाला हृदय विकाराचा झटका आला असे डॉक्टर जेव्हा सांगतात अमूक अमूक रक्कम एवढा खर्च लागेल. आपली परिस्थिती नसतांनाही आपण एनकेन प्रकारे व्यवस्था करतोच की, का ? का करतो आपण अशी व्यवस्था ? कारण, अहो ही इमरजन्सी आहे, हे करणे तातडीचे आणि अत्यावश्यक आहे. बरोबर आहे की नाही ? एकदम करेक्ट !

मग ही अशी पाण्याची काटकसर करण्यासाठी ही इमरजन्सीच आहे असं आपण ठरवलं तर काय होईल ? आपण पाणी बचत ही बाब अत्यावश्यक आणि तातडीची आहे, असं मनातून मान्य केलत तर आपण इकडची दुनिया तिकडे कराल पण काही शेतीक्षेत्रासाठी प्रायोगिक पातळीवर एक प्रयोग म्हणून ठिबक - तुषार सिंचन संच, सूक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर प्रत्यक्षात एक प्रात्यक्षिक म्हणून करून तर बघा, पुढे मी काहीच सांगण्याची किंवा कोणालाच विचारण्याची तुम्हाला गरजही पडणार नाही. ठिबक सिंचन करतांना, ड्रिपरमधून शेतात पडणाऱ्या पाण्याच्या एका थेंबाचा सूक्ष्म आवाजदेखील तुम्हाला एखाद्या मधुर संगिताप्रमाणे ऐकू येईल, आणि मग तुम्ही माझी ही बड बड रेडिओचो बटण बंद करून कायमची बंद कराल. कारण तुम्हाला तो ठिबक च्या थेंबाचे संगीत ऐकायचे आहे ना ?

डॉ. रे.भ. भारस्वाडकर

डॉ. रे.भ. भारस्वाडकर - मो : 09325082089