त्र्यंबकेश्वरी गाडलेल्या गोदेचा टाहो

Submitted by Hindi on Sat, 10/03/2015 - 11:50
Source
जल संवाद

ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावलेली गोदावरी नदी गंगाद्वारहून कुशावर्तात येते. त्यानंतर तिचा प्रवाह गाडला गेला आहे. लक्ष्मीनारायण मंदिरापासून त्या ठिकाणी नदीवर काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. गोदावरी त्र्यंबकेश्वरला कुशावतीत अवतरली. त्यानंतर तिचा पुढचा सगळा प्रवास खळाळणाराच ! पण पौराणिक कथेनुसार आधी यंत्रणेने गायब केली, सर्वप्रथम नदीपात्रात सिमेंट ओतून तिचे नैसर्गिक जलस्त्रोत संपवत गोदावरी ला मारले.

गोदावरी अन् त्र्यंबकनगरीने सत्ययुगापासून अगदी पेशवाईपर्यंत अनेक वळणे घेतली. पण आज या दोन्हींची अवस्था त्या वारशाला कलंक लागावा, अशी आहे. ब्रह्मगिरीच्या उदरातून जगाच्या कल्याणासाठी प्रकटलेली गोदा बाल्यावस्थेतच पुरती गुदमरली आहे. त्र्यंबकेश्वरात काँक्रिटीकरणाने पूर्णपणे गाडून टाकल्याने तिचा प्रवाह गायब झाला आहे. जिथे ती थोडीफार दिसते, तिथे तिची अवस्था गटारीपेक्षा वेगळी नाही. उगमाशीच दबलेल्या गोदेचे अस्फुट रूदन ना कुणाच्या कानापर्यंत गेले, ना कुणी तिची अवहेलना पाहून हेलावले.... सिमेंट काँक्रिट म्हणजेच विकास, असे मानणाऱ्यांपासून न वाहणाऱ्या गंगेच्या काठावर श्रध्देची दुकाने चालवणाऱ्यांपर्यंत कुणालाही तिच्या या स्थितीचा ना खेद ना खंत ....! पण कधीकाळी ब्रह्मगिरीच्या कड्यांना थरथरवणाऱ्या नि त्र्यंबकराजाच्या पायाशी खळाळणाऱ्या गोदावरीचा टाहो बाहेर पडलाय... तिच्या अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुखातून तो थेट हरित लवादापर्यंत गेलाय... तिच्या काठावर वसलेला समाजही जागा होतोय... तिची अशी अवस्था करणाऱ्यांना आता उत्तरे द्यावीच लागतील.... !

दक्षिणगंगा गोदावरीला प्रदूषणामुळे गटारगंगेची अवकळा आली आहे. उगमापासून तिची सुरू झालेली हेळसांडही या अवस्थेला कारणीभूत आहे. विकासाच्या नावाखाली त्र्यंबकेश्वरमध्येच पात्राची गळचेपी करण्यात आल्याने तिचा प्रवाह लुप्त झाला आहे. या स्थितीची गंभीर दखल राष्ट्रीय हरित लवादाने (नॅशनल ग्रीन ट्रिव्यूनल) घेतली आहे. त्र्यंबकेश्वर येथील तनिष्का सदस्या ललिता शिंदे यांच्यासह गोदावरी गटारीकरणविरोधी मंचाचे राजेश पंडित व निशिकांत पगारे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून लवादाने त्र्यंबक नगरपालिकेसह नाशिकचे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच राज्य व केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. त्यांना येत्या 16 जानेवारीपर्यंत याबाबत अहवाल देण्यास सांगितला आहे.

ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावलेली गोदावरी नदी गंगाद्वारहून कुशावर्तात येते. त्यानंतर तिचा प्रवाह गाडला गेला आहे. लक्ष्मीनारायण मंदिरापासून त्या ठिकाणी नदीवर काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. गोदावरी त्र्यंबकेश्वरला कुशावतीत अवतरली. त्यानंतर तिचा पुढचा सगळा प्रवास खळाळणाराच ! पण पौराणिक कथेनुसार आधी यंत्रणेने गायब केली, सर्वप्रथम नदीपात्रात सिमेंट ओतून तिचे नैसर्गिक जलस्त्रोत संपवत गोदावरी ला मारले. त्र्यंबकेश्वरच्या गटारीचे पाणी गोदावरीच्या पात्रातच सोडण्यात आले.

नागबली घाटाचे अतिक्रमण :


मुख्य मंदिराच्या मागील बाजूला गायत्री मंदिर आहे. तेथेच नारायण नागबलीचा विधी होतो. देशात फक्त त्र्यंबकेश्वर येथील याच घाटावर हा विधी करण्याची परंपरा आहे. त्यासाठीचे देशभरात मोठे नेटवर्क आहे. केंद्रीय व राज्यस्तरीय उच्चाधिकाऱ्यांपासून तर मंत्री आणि हायप्रोफाईल मंडळींचा येथे राबता असतो. त्यामुळे लांबच लांब पत्र्याचे शेड आणि सिमेंट ओतून नदीपात्रात प्रचंड अतिक्रमण झाले आहे. ज्या ठिकाणी नदीपात्रात कधी काळी वाळू उपसा होता, त्या ठिकाणी सिमेंटचा घाट बांधण्यात आला आहे. गर्दीच्या सोयीसाठी तात्पुरते पत्र्याचे शेड उभारले आहेत. नारायण नागबली विधीला येणाऱ्या मंडळींच्या सोयीसाठी घाट बांधताना ज्या पात्रावर हा विधी केला जातो, त्या गोदावरीचे पात्र आकुंचित करून नदीला सिमेंटचा नाला करून टाकला आहे. सिमेंटच्या नाल्याचे रूप आलेल्या या भागात पिंडदानाचे विधी होतात. गोदावरीच्या जिवावर दर दिवशी कोट्यावधी रूपयांची उलाढाल याच घाटावर चालते. शासकीय यंत्रणेलाही करापोटी लक्षावधीचा महसूल मिळतो, पण या यंत्रणेला नाल्यातून इतरांना जाणवणारी दुर्गंधी कशी जाणवत नाही ? हा प्रश्न सामान्य भाविकांना आणि गोदावरीप्रेमींना पडतो.

गायत्री मंदिराजवळ तात्पुरते दर्शन :


मुख्य मंदिराच्या भाविकांच्या सोयीसाठी नावाखाली प्रचंड काँक्रिटीकरण झाले असून, त्या ठिकाणी कुठेही गोदावरी चे दर्शन होत नाही. मागील कुंभमेळ्यात दुसऱ्या टप्प्यातील काँक्रिटीकरण याच भागात झाले. पूर्वीप्रमाणे गेल्या वेळच्या यंत्रणेने कुंभमेळ्याचा निधी गोदावरी काँक्रिटीकरण करण्यासाठी वापरला. त्यामुळे शासकीय यंत्रंणेने कुशावर्तापासून जमिनीत गाडलेल्या गोदावरीचे दर्शन होते, ते थेट गायत्री मंदिराजवळ. मात्र, काही ठराविक वेळेपुरतेच.

गोदावरी - अहिल्या संगमाची वाट :


त्र्यंबकेश्वर गावात गोदावरीचा नैसर्गिक प्रवाह नष्ट करण्यात आला आहेत, पण अहिल्या नदीची अवस्थाही फारशी वेगळी नाही. गोदावरी आणि अहिल्या या दोन नद्यांचा संगम हा दोन नाल्यांच्या मिलनाच्या रूपात घडतो. गोदावरी आणि अहिल्येला सरकारी यंत्रणेने बांधलेल्या नाल्यातून वाहावे लागते, ज्या नाल्यात अन्य अनेक नाले सोडले आहेत. पाण्याची दुर्गंधी येते. पिंडदानाचे साहित्य, भातासारखे पदार्थ उघड्यावर सोडले जातात. ते वाहून नेणारी यंत्रणा नाही. आगामी कुंभमेळ्यात तर अहिल्या संगमापर्यंत परिसर काँक्रिटीकरण करून बुजविला जाण्याची शक्यता वर्तविली जाते.

नैसर्गिक व्यवस्थांची लावली वाट :


गोदावरीची एवढी दुरवस्था उगमानंतर लगेच झाली असेल तर तेथील इतर तलाव आणि नदीला मिसळणाऱ्या नैसर्गिक व्यवस्थांची किती दुरवस्था झाली असेल, याची कल्पनाच केलेली बरी ! याची उदाहरणेही त्र्यंबकेश्वरमध्ये कमी नाहीत. येथे पुराणात उल्लेख असलेले तलाव त्याचे उत्तम उदाहरण आहेत. एका तलावात प्रचंड पाणवेली आहेत. दुसरा देवमाशांचा तलाव. तेथे भाविक पावासह अन्नपदार्थांचे टुकडे टाकतात. एक तुकडा टाकला तर हजारोंच्या संख्येने मासे अंगावर येतात. पुरेसा ऑक्सिजनही मिळू न शकणाऱ्या अनेक जलचरांच्या रक्षणाचा पर्यावरणीय विचार त्र्यंबकेश्वर येथील शासकीय यंत्रणेच्या खिजगणतीतही नाही. तिसऱ्या तलावाची स्थिती आणखी वेगळी. पावसात पाण्याने तलाव भरल्यानंतर ठराविक पातळीवर पोहोचलेले पाणी तलावातून नदीत मिसळण्याची पारंपारिक व्यवस्थाच इथल्या सरकारी यंत्रणांनी मोडून काढली आहे. तलाव भरल्यानंतर नदीला सोडलेले पाणी वाहून नेणापा नैसर्गिक नाला बुजवून त्यावर रस्ता आणि इमारती उभ्या करायला परवानगी देण्यात आली आहे.

गोदावरीचे पाणी पिणाऱ्यांसाठी आणि पात्रात स्नान करणाऱ्यांसाठी तिचे प्रदूषण अत्यंत धोकादायक बनले आहेच, शिवाय तिथे एकूणच जल -जीव पर्यावरणाच्या दृष्टीनेही घातक ठरले आहे. नाशिक शहरात गोदावरीचा प्रवेश झाल्यापासून अनेक घटक तिचे पात्र प्रदूषित करतात आणि प्रदूषणाचा हा विळखा पुढे वाढत जातो. पण जिथे उगम होतो, त्या त्र्यंबकेश्वरात तर तिची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. ब्रह्मगिरीमध्ये उगम झाल्यानंतर कुशावर्तात दर्शन देणारी गंगा, तिथून पुढे मात्र पालिका आणि अन्य यंत्रणांच्या कारनाम्यांनुळे लुप्तच झाली आहे.

गोदेच्या या अवस्थेबाबत हरित लवादाकडे दाद मागण्यात आली आहे. त्र्यंबकमधील तनिष्का सदस्या लिना संदीप शिंदे, गोदावरी गटारीकरणविरोधी मंचाचे राजेश पंडित आणि निशिकांत पगारे यांनी लवादाच्या पश्चिम विभागीय खंडपीठाकडे याचिका दाखल केली आहे. गोदावरीचे मूळ रूप संपुष्टात आले आहे, नदीच्या पात्रात सूर्यप्रकाश पोचत नसल्याने तिच्यात मिसळणारे नैसर्गिक जलस्त्रोत बंद झाले आहेत. तिच्यातील जीवसृष्टीही धोक्यात आली आहे व एकूणच या स्थितीमुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, या आणि अशा विविध गंभीर बाबींकडे लक्ष वेधून संबंधित घटकांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लवादाचे न्या. व्ही. आर. किनगावकर आणि तज्ज्ञ सदस्य डॉ.अजय देशपांडे यांनी या याचिकेची गंभीर दखल घेत त्र्यंबकेश्वर नगरपालिका, जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यासह केंद्रीय पर्यावरण सचिव आणि राज्याच्या जलसंपदा विभागाच्या सचिवांना नोटीस बजावली आहे. त्र्यंबकेश्वरमधील गोदावरीच्या या स्थितीबाबत 16 जानेवारीपर्यंत अहवालाच्या स्वरूपात म्हणणे सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. गोदावरीच्या लुप्त पात्रावरच बाजार :

दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या गोदावरीला शासकीय यंत्रणेने तिच्या उगमस्थानी त्र्यंबकेश्वरमध्येच गाडली आहे. स्त्रीभ्रूणहत्याप्रमाणेच गोदावरीचा गळा जन्मस्थळीच घोटण्यात आला आहे. गोदावरी कुशावर्तातून बाहेर पडते, पण त्र्यंबकेश्वरमध्ये ती नेमकी जाते कुठे हे शोधूनही सापडत नाही. इतकी तिची अवस्था बिकट बनविण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वरच्या नगरपालिकेसह शासकीय यंत्रणेने काँक्रिटीकरण करून तिच्यावर चक्क बाजार बसविला आहे. ज्या नदीच्या बळावर त्र्यंबकेश्वर तीर्थस्थळ म्हणून मिरवते त्या नदीच्याच गळ्याला लोकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नगरपालिकेने असे नख लावणे निश्चितच शोभा देणारे नाही.

बारा जोर्तिलिंगापैकी प्रमुख तीर्थस्थळ असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये देशभरातून भाविकांचा राबता असतो. त्यामुळे नाशिकच्या अर्थकारणात भर घालणारे शहर म्हणून त्याचे वेगळे महत्व आहे. रिक्षा, टॅक्सी, हॉलेटपासून व ट्रॅव्हल्स आणि धार्मिक कर्मकांडांसह अनेक व्यवसाय याच पर्यटकांच्या आधारावर चालतात. त्र्यंबकेश्वरला हे सगळे महत्व प्राप्त झाले ते गोदावरीचे उगमस्थान म्हणून ! या स्थानाच्या भरभराटीला, गोदावरी या नावाचा आधार आहे. हे सगळे विस्ताराने स्पष्ट करण्याचे कारण म्हणजे ज्या गोदावरीच्या नावावर त्र्यंबकेश्वरचा भरभराट झाला आणि सध्याही होणार आहे ती गोदावरीच त्र्यंबकेश्वरमधून स्वत:हून लुप्त झाली नाही, तर शासकीय यंत्रणेने तिला गाडली आहे.

जन्माला येण्यापूर्वीच हत्या करावी अशा स्त्रीभ्रूणहत्यासमान उघडउघड गोदावरीची तिच्या उगमस्थानीच हत्या करण्यापर्यंतचा प्रमाद बिनदिक्कत घडतो आहे. पण, ना खेद ना खंत, अशी त्र्यंबकेश्वरमधील स्थिती आहे. तिच्या दर्शनाची आस धरून येणाऱ्यांना.... तिच्या जिवावर पैसे कमविणाऱ्यांना... आणि नारगिकांसह शहरवासीयांच्या आरोग्याची कायद्याने जबाबदरी ज्यांच्यावर सोपविली आहे त्या शासकीय यंत्रणेलाही या माणसांच्या आयुष्यांची जीवनदायिनी असलेल्या गोदावरीच्या हत्येचे सोयरसुतकही वाटत नाही. त्यामुळेच गोदावरी नदीवर दोन टप्प्यात काँक्रिटीकरण करून त्यावरून शहराचा मुख्य रस्ता बनविण्यात आला आहे.