उदक वळवू या युक्तीने

Submitted by Hindi on Sat, 06/04/2016 - 15:18
Source
जल संवाद

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्‍न सोडविणे ज्यांना महत्वाचे वाटते, त्या सार्‍यांनी यावर अधिक गांभीर्याने विचार करायला हवा. राज्यकर्त्यांनी जर मनात आणले तर ही योजना ते प्रत्यक्षात आणू शकतील. एका पावसाळ्यातच ‘जलशिवार’ योजनेचे यश दिसू लागले आहे.

कोकणाच्या पूर्वेला, समुद्रापासून सुमारे चाळीस ते साठ किलोमीटर अंतरावर ‘सह्याद्री’ पसरलेला आहे. दक्षिणोत्तर पसरलेल्या या डोंगर रांगा सुमारे तीन हजार फूट एवढ्या उंचीच्या आहेत. महाबळेश्वर, माथेरान, त्र्यंबकेश्वर अशा काही ठिकाणी या डोंगरांची उंची वाढलेली दिसते. महाराष्ट्राच्या पार उत्तर टोकापासून दक्षिणेच्या सीमेपर्यंत सुमारे सहाशे किलोमीटर लांब व वीस ते तीस किलोमीटर रूंद एवढे क्षेत्र या डोंगर रांगांनी व्यापलेले आहे. सह्याद्रीच्या पश्‍चिमेकडील उतार तीव्र आहे. कोकणाकडील उतार हा काही ठिकाणी समुद्रसपाटीपासून चारशे ते साडेचारशे फूट उंचीएवढा खाली उतरतो. पूर्वेकडील पठारी प्रदेश समुद्रसपाटीपासून सुमारे दोन हजार ते पंधराशे फूट एवढ्या उंचीवर आहे व त्या दिशेला पर्वतरांगा जास्त लांबवर पसरलेल्या आहेत. पूर्वेला पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. तेथील डोंगर उतारावर धूप होण्याचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे पूर्वेकडील उतारांची तीव्रता आपोआपच कमी होते.

मान्सूनमध्ये समुद्रावरून येणारे ढग या सह्यपर्वतात अडवले जातात. त्यामुळे कोकणामध्ये शंभर ते दीडशे इंचाच्या दरम्यान पाऊस पडतो. समुद्राकडून सह्याद्रीच्या रांगाकडे जावे तसे पावसाचे प्रमाण वाढत जाते. सागराजवळच्या परिसरात शंभर ते एकशेवीस इंचाच्या दरम्यान पाऊस पडतो. तर सह्याद्रीच्या माथ्यावर, काही ठिकाणी दोनशे ते सव्वादोनशे इंच एवढे पाणी पडते. सह्याद्रीच्या पश्‍चिम उतारावर जेवढे पाणी पडते तेवढे पाणी पूर्वेकडील उतारावर पडत नाही. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेशात पावसाचे प्रमाण एकदम कमी होते. पर्जन्यछायेच्या या परिसरात जेमतेम पंचवीस ते चाळीस इंच एवढाच पाऊस पडतो. पूर्वेकडे जावे तसे पावसाचे प्रमाण आणखी कमी होत जाते. माथ्याकडील पश्‍चिमेकडील परिसरातच पावसाचे बरेचसे पाणी पडत असते.

पश्‍चिमेकडील उतार तीव्र असल्याने हे पाणी वेगाने खाली उतरते. कोकण हा दक्षिणोत्तर लांबवर पसरलेला प्रदेश आहे. प्रदेशाची रूंदी खूप कमी आहे. हा परिसर जेमतेम चाळीस ते साठ किलोमीटर एवढा रूंद आहे. कोकणाचे क्षेत्र महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत, जेमतेम दहा टक्के एवढेच आहे. महाराष्ट्रात जेवढा पाऊस पडतो, त्यापैकी सुमारे 45 टक्के एवढा पाऊस कोकणामध्ये कोसळतो. कोकणात होणार्‍या पर्जन्यवृष्टीपैकी बरेच पाणी हे सह्याद्रीच्या माथ्यावर व उताराजवळच्या परिसरात पडत असते. सह्याद्रीत कोसळणारे सर्व पाणी अडवून त्या जागी मोठी धरणे बांधणे शक्य नाही. त्यामुळे हे सर्व पाणी वहात समुद्राला जावून मिळते. पावसाळ्यात कोकणामध्ये अनेक वेळा पूर येतात. डोंगर उतारावर पडणारे हे पाणी खूप वेगाने खाली उतरत असते. खाली येताना बर्‍याच मोठ्या प्रमाणावर मातीची धूप होते. यामुळे डोंगर उतार तर उघडे पडतातच, परिणामी मोठ्या प्रमाणावर खाड्या होतात. पूराचे पाणी जास्त क्षेत्रात पसरू लागते. त्याचा परिणाम जनजीवनावर होत रहातो.

सह्यमाथ्यावर पडणारे हे पाणी माथ्यावरील काही डोंगर उतारांवरूनच पूर्वेला वळवायला हवे. हे पाणी उतार उतरून पश्‍चिमेला खाली आल्यानंतर परत वर उचलणे शक्य नाही. त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर ऊर्जा लागेल. सह्यउतार उतरून खाली आलेले पाणी साठवण्यासाठी खूप मोठा परिसर लागेल. कोकणात एवढी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे माथ्यावरील काही डोंगरांचा सर्व्हे करून हे पाणी कोठे अडवायचे व कसे वळवायचे याचा अभ्यास व्हायला हवा.

कोकणातून पूर्वेला जाणारे सर्व घाट हे या डोंगर रांगांतूनच जातात. घाटमाथ्यावर रस्त्याच्या दोनही बाजूला खूप उंचीपर्यंत पसरलेल्या डोंगररांगा दिसत रहातात. घाट काढताना तो कमीतकमी किती उंचीवरून पलीकडे नेता येईल. याचा विचार केला जातो. त्यामुळे घाटरस्त्याच्या उंच पसरलेल्या या डोंगर उतारांवरचे पाणी या रस्त्यांपर्यंत पडते. रस्त्यापेक्षाही उंच पसरलेल्या या डोंगर उतारांवरचे पाणी या रस्त्यांपर्यंत खाली आणून ते पूर्वेकडे सहज वळविता येईल. घाटरस्त्यातून जात असताना फक्त रस्त्याबाजूचे डोंगर उतार दिसतात. पण असेच उतार दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्यरांगांवर सर्वत्र पसरलेले आहेत. डोंगरउतारांवर पडणारे पावसाचे पाणी नजीकचा उतार शोधून पश्‍चिमेकडे उतरते.

त्याची दिशा बदलून हे पूर्वेला वळविता येईल. पाणी एकदा पूर्व उतारावर वळवल्यावर त्याचे पुढे काय होते, याचा विचार करण्याची आवश्यकता नाही. हे पाणी पूर्वेकडील कोणत्या तरी नदीच्या खोर्‍यातच उतरणार आहे. सह्यपूर्वेला पसरलेल्या पठारी प्रदेशालाच पाण्याची समस्या भेडसावीत आहे. सहाशे किलोमीटर लांबवर पसरलेल्या, माथ्याजवळील सहाशे ते हजार फूट उंचीवरील या डोंगर उतारांवरचे पाणी पूर्वेकडे जाण्याने महाराष्ट्रातील कितीतरी भूप्रदेशाची पाण्याची समस्या सहज मिटविता येईल. पश्‍चिमेकडील उतारांच्या क्षेत्रावर नेमके किती पाणी पडते, याचा तपशील सहज मिळू शकेल. यापैकी किती टक्के पाणी, कसे वळवायचे याचा सर्व्हे मात्र व्हावा लागेल.

दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगांवर दक्षिणोत्तर असेच, पण उताराच्या दिशेने जाणारे चर खोदता येतील किंवा योग्य आकाराची गटारांसारखी रचना बांधून काढता येईल. हे चर किती अंशाच्या उतारातून / कोनातून, कसे न्यायचे हे निश्‍चित करावे लागेल. जमिनीत पाणी मुरू नये, उताराच्या दिशेने ते वाहून जावे, म्हणून गटारे बांधली जातात. तशाच पध्दतीची ही रचना असेल. हे चर आकाराने कालव्यांएवढे मोठे असणार नाहीत. उताराच्या दिशेने पश्‍चिमेला वाहून जाणारे पाणी पूर्वेला वळवायचे यासाठी हे चर खोदायचे आहेत. यापैकी काही पाणी झिरपून पश्‍चिमेकडे जाईलही. पण हा चर फुटून हे सर्व पाणी कोकणाच्या दिशेने वाहून जाणार नाही, एवढाच मर्यादित उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे चर खोदले, बांधले जायला हवेत. दोन डोंगरांमधील कमीतकमी उंचीचे परिसर निवडून त्यामधून हे पाणी पूर्व उतारांवर सहजपणे नेता येईल.

यासाठी डोंगररांगाच्या रचनेचा अभ्यास करावा लागेल. किती डोंगरउतारांवरील पाणी, कोणत्या परिसरातून, कसे वळवायचे याचे सर्व्हे करावे लागतील. महाविद्यालयातून भूगोल शिकणारी मुले हे काम करू शकतील. इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांकडूनही हे काम करवून घेता येईल. गुगल मॅप्सवर या डोंगररांगा सहज दिसत असल्याने, कांप्युटर सायन्स शिकणारी मुलेही, खोलीत बसून या संदर्भातील काही काम करू शकतील. हे असे काम करण्याबद्दल यू जी सी कडून अनुदान मिळवणेही शक्य आहे.

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्‍न सोडविणे ज्यांना महत्वाचे वाटते, त्या सार्‍यांनी यावर अधिक गांभीर्याने विचार करायला हवा. राज्यकर्त्यांनी जर मनात आणले तर ही योजना ते प्रत्यक्षात आणू शकतील. एका पावसाळ्यातच ‘जलशिवार’ योजनेचे यश दिसू लागले आहे. पाणी वळविण्याच्या योजनेवर जर तसेच काम झाले तर पूर्वेकडील पठारी प्रदेशाच्या पाण्याचा प्रश्‍न सुटायला निश्‍चितच मदत होणार आहे.

श्री. विजय भिड, मो : 09850168841 bhidevijayv@gmail.com