Source
जल संवाद
झोपले अजून माळ तापवीत काया
असंख्य या नद्या अजून वाहतात वाया
अजून हे अपार दु:ख वाट पाहताहे,
अजून हा प्रचंड देश भीक मागता है।।
मला सुध्दा त्यांनी आज भी खरे है तालाब व गोट्या ही पुस्तके भेट म्हणून देऊन उदारतेचा पुरावा दिला. समाजामध्ये अशी अनमोल रत्न आहेत. त्यांचे मूल्य आपण ओळखले पाहिजे व त्यांनी अंगिकारलेले व्रत नुसते पहाण्यापेक्षा त्यापासून बोध घ्यायला हवा असे अगदी मनापासून, प्रकर्षाने मनात आले. त्यांच्या या ध्यासाला, छंदाला, मनस्वी वृत्तीला खरंच प्रणाम. त्यांचा प्रकल्प प्रयोग म्हणून तरी कोणीतरी प्रायोजक पुढे येईल व त्यांचे स्वप्न पूर्ण होईल अशी प्रार्थना परमेश्वराकडे करून त्यांना शुभेच्छा देऊन इथेच थांबते.
पाणी ! पाणी !! पाणी !!! पाणी कपात. फक्त एकदाच पाणी. एक दिवसाआड पाणी, पुण्यासारख्या ठिकाणीसुध्दा पाण्याने हाहाकार उडवला. एकदाच येणारे पाणी. पाण्याची काटकसर अंगवळणी पडायला वेळच लागला. पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी धडपड सुरू झाली आणि अशा या वातावरणात श्री. अशोक केशवराव चंदनपूरकरांचे नाव कानावर आले.एक दोन महिन्यात 5 -6 जणांकडून त्यांच्याबद्दल कौतुकाचे उद्गार कानावर आले. त्यांनी म्हणे पाण्याविषयी संशोधन केले आहे. पाणी या एकाच विषयाचा त्यांचा ध्यास आहे. कोठेही पाण्याविषयी एखादी माहिती मिळाली, लेख मिळाले, पुस्तक मिळाले की त्यांनी ते घेतलेच समजावे. कात्रण काढून त्याचा संग्रहात समावेश करायचा असा त्यांचा छंदच आहे. अनेक पुस्तके त्यांनी जमवली आहेत, वाचली आहेत. त्यांचे संशोधन प्रकल्प त्यांनी ठिकठिकाणी दिले आहेत वगैरे. मनात एकदम कल्पना आली. त्यांची मुलाखत घेऊ या. आपली ही जिज्ञासा पूर्ण होईल व उपयुक्त माहितीही लोकांसमोर येईल आणि एखादा प्रायोजक त्यांचा संशोधन प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी मिळूनही जाईल, आशावाद प्रचंड होताच. लगेच त्यांना फोन करून मुलाखतीची वेळ ठरवली.
दुसऱ्या दिवशी उत्साहाने 10। च्या सुमारास त्यांच्या घरी पोहोचले. 73 वर्षांचे चंदनपूरकर हात जोडून सस्मितपणे माझ्या स्वागताला पुढे आले. मी दरवाजातून आत गेले. घरात शिरल्यावर डावीकडे बघितले बापरे ! डावीकडची खोली आढ्यापर्यंत पुस्तकांच्या गठ्ठयाने भरलेली प्रत्येक बंडल व्यवस्थित दोरीने बांधलेले. ते मला दुसऱ्या खोलीत घेऊन गेले. दोन्ही गोदरेजची कपाटे मोठमोठ्या विश्वकोशांसारख्या महत्वाच्या पुस्तकांनी भरलेली. पुन्हा बाहेरच्या हॉलमध्ये आलो. डायनिंग टेबलवरही असंख्य पुस्तके ठेवलेली. छोट्या टेबलवर टेलिफोन, कोपऱ्यामध्ये आडवे उभे रॅक्स, त्यामध्येही पुस्तके, पुस्तकेच पुस्तके. अभावितपणे माझ्या तोंडून प्रश्न बाहेर पडला. एवढी सगळी पुस्तके तुम्ही वाचलीत ? त्यांनी अतिशय नम्रपणेव निगर्वीपणे सांगितले, नाही नाही, सर्व नाही वाचली पण बरिचशी वाचलीत कारण व्ही आर एस घेतल्यापासून मी केवळ ह्याच नादात आहे, त्यांच्या कामाविषयी, ध्यासाविषयी प्रश्न विचारायच्या आधी मी त्यांनी विचारले -
तुमच्या मिसेस चंदनपूरकरांचे काय म्हणणे आहे या तुमच्या व्यासंगाबाबत ?
मला वाटले, ते तिच्या रागाबद्दल, उद्विग्नतेबद्दल बोलतील पण ते म्हणाले, तिचं म्हणणं असं आहे की तिच्या नवऱ्याला अगदी खांडाचही व्यसन नाही. ह्या पुस्तकांची संगत म्हणजे सत्संगच आहे असं ती मानते. त्रास पडतो, कष्ट पडतात, कटकटही होते पण दुसऱ्या इतर व्यसनांपेक्षा हे बर नं. असं तिचं म्हणणं. भाग्यवान आहे मी. त्या माऊलीला मनोमन दंडवत घातले मी. तेवढ्याच त्यांची दोन नंबरची मुलगी बाहेर आली. मोठीचे लग्न झालेय. दुसरी बरीच अबोल वाटली तरी मी तिला विचारलेच, यांच्या पुस्तकांविषयी, प्रकल्पांविषयी तुझे काय मत आहे ? तुम्ही सर्वांनी त्यांचा प्रकल्प पूर्ण व्हावा म्हणून काही प्रयत्न केलेत का ?
ती म्हणाली, अहो, एखादं पुस्तक जरा दुसरीकडे ठेवलेलं त्यांना चालत नाही. आम्ही त्यांना काही सुचवलं तर पटत नाही, त्यांच्यामध्ये काही बोललेल त्यांना आवडत नाही. फार एककल्ली आहेत त्यामुळे त्यांचे त्यांच्यापाशी लोकांना काय होतय नुसत कौतुक करायला ? कोणाकडून भरीव मदत होत नाही.
मी सर्व ओळखले व पुन्हा माझा मोर्चा चंदनपूरकरांकडे वळवला. त्यांना तिची नाराजी आधीच माहिती होती त्यांनी हसण्यावारी नेऊन वातावरण पुन्हा हलकेफुलके केले.
मी विचारले, पण पाणी हाच विषय तुमच्या मनात कसा आला ? त्या विषयीचा ध्यास घेतला तो कोणत्या कारणाने ?
ते सांगू लागले माझा जन्म झाला धुळ्याजवळ, कौसुंबे नावाचे गाव आहे तेथे, 8.12.1939 साली. 7 वीत असताना सानेगुरूजींचे 'धरपडणारी मुले' हे पुस्तक वाचले तेव्हापासून खेड्यात जाऊन शिक्षक म्हणून नोकरी करण्याची इच्छा निर्माण झाली. 4 थी पर्यंत आमची स्थिती उत्तम होती. पण जागतिक मंदी आली. व्हर्नाक्युलर फायनलची परीक्षा देऊन पुण्यात औंधला आयटीआय चा ड्राफ्टसमनचा कोर्स केला. लहान असताना पाहिलं धुळे, जळगावकडून आग्रारोडने जनावरांचे थवे यायचे. कपाशीच्या पिकाला 'झेड्रिन' फवारलेले द्रव्य पाण्याबरोबर वाहून आले ते पाणी पिण्यामुळे खूप जनावरे मृत्युमुखी पडली. पाण्याचे दुर्भिक्ष्य, पुरेसे पाणी नाही, त्यावेळी मनावर हे बिंबले गेले. पुरेसे पाणी कसे उपलब्ध होईल ? त्याचाच विचार सारखा मनात यायला लागला.
म. गांधीजींचे 'मेरी आत्मकथा' वाचनात आले. ग्रामसेवा, जलसमृध्द खेडे कसे निर्माण होईल हाच विचार मनात येऊ लागला आणि त्याच वेळी येवला गावी छबीलदास गंगाराम म्हणून दानतीने चांगले असणारे, सावकार नगरसेवक होते, त्यांनी अर्धा मैल खड्डा खणला, पहिल्या पावसाने तो तुडुंब भरला. ही गोष्ट साधारण इ.स. 1910 च्या आसपासची त्याचवेळी जुन्नर जवळील नेतवड धरणातील गाळ काढून घ्यावा अशी वाचकांची पत्रे वाचनात आली. त्यावरून 'डोह' ही कल्पना, सोपी संकल्पना मनात रूजली. त्वरित लाभ देणारी विपुल शाश्वत जल देणारी, संकल्पना मनात सारखी येऊ लागली. त्याचवेळी लकाकी तळं खोदून त्यातील दगड, मुरूम, खडी यांनी फग्युर्सन कॉलेजचे शैक्षणिक संकुल बांधलेले वाचनात आले म्हणजे तळं खोदलं की मुरूम, दगड, खडी वाहतूक खर्च वाचतो परकीय चलन वाचते पर्यावरणात भर पडते असे फायदे दिसले. मग देशभरातील पाण्याचा अभ्यास सुरू केला.
पांडवांनी जेव्हा राजसूय यज्ञ केला तेव्हा नारदाने युधिष्टिराला प्रश्न केला, राजा, राज्यातील सर्व तळी तुडुंब भरली आहेत नं ? म्हणजे पांडवकालापासून तळ्यांचा उपयोग सर्वांना माहित होता. तळी खोदून त्याभोवती बांध घालून बांधाशेजारी झाडे लावून मंदिरे बांधून वर्षभर पुरेल इतकी पाण्याची व्यवस्था गावकरी करीत असत. सर्व भारतभर अशी कितीतरी तळी होती, आजही आहेत. पण इंग्रजी राजवटीत नळांनी घरापर्यंत पाणी पुरवठा सुरू केला. तळ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. तळ्यातील गाळाचा उपसा नियमित न झाल्याने तळ्यामधील पाणी पुरेनासे झाले, गाळ काढण्याचा खर्च खूप होतो अशा सबबी सरकारने सांगून उदासीनता दाखवली. परिणामी कितीतरी तळी बुजली गेली, काही ठिकाणी उद्याने केली गेली, उदाहरणच द्यायचे झाले तर सारसबागेचे देता येईल. तळ्यातला गणपती म्हणून प्रसिध्द असलेले ठिकाण आज सारसबाग म्हणून प्रसिध्द आहे.
तळ्यांची जी अवस्था तीच विहीरी, कुंड, आड, हौद वगैरेंची झाली. भूजल पातळी कमी झाली, आणि मग चंदनपूरकरांनी एक योजना 'अगस्ति खंदक सामूहिक साठवण तलाव योजना' आखली सर्व बाजूंनी अभ्यास सुरू केला. उताराच्या दिशेने एक तलाव खोदायचा, ओढ्याच्याजवळ त्यातील मुरूम, खडक, खडी यांचा उपयोग बांधासाठी करायचा, तळे पूर्ण भरले की जास्तीचे पाणी बांधावरून वाहत जाऊन ओढ्याला मिळेल किंवा त्या तळ्यापेक्षाही उतार असलेल्या दुसऱ्या जागेत जे तळे बांधले असेल त्याच्यात जाईल अशी साखळी योजना आखायची त्यामुळे वर्षभर मुबलक पाणी साठा होईल जो गावाला किंवा शहराला मिळेल.
राळेगणसुध्दी व हिवरे बाजार येथे अशा पाणी साठवणीच्या योजना आखून गावजलपूर्ण केलेले आहे. मा.अण्णा हजारे व मा. पोपटराव पवार यांचे कार्य सर्वांना परिचित आहेच. चंदनपूरकर सांगतच होते.
महाराष्ट्रात पावसाळ्यात चार महिन्यात नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. अवेळी पडला तरी, अनियमित पडला तरी, सगळीकडे सारख्या प्रमाणात नाही पडला तरी सर्व महाराष्ट्रात सरासरी प्रत्येक ठिकाणी 100 तास तरी जोरदार पाऊस पडतो. पण हे सगळे पाणी वाहून जाते, थोडेसे जमिनीत मुरते, पाण्याचे दुर्भिक्ष्य चालू होते हे टाळण्यासाठी - 1. हा पाऊस पडतो तेथेच, 2. जेव्हा पडतो तेव्हाच अडवला पाहिजे, 3. भूपृष्ठ पातळीखाली जिरवला पाहिजे.
महाराष्ट्राचा सुमारे 82 टक्के भाग बेसॉल्टचा आहे त्यामुळे पाणी जमिनीत फारसे मुरत नाही.
जर अगस्ति खंदक सामूहिक पाणी साठवण तलाव निर्माण केला तर पाणी साठवले जाईल. 100 टक्के जलसंधारण व मृदसंधारण होईल. इंधनाची गरज नाही कारण प्रवाही पध्दतीने पाणी साठवण, विलंब नाही त्वरित लाभ देणारी योजना, भांडवली गुंतवणूक नाही फक्त खोदकामाच्या मजुरीचा खर्च, माती, मुरूम, दगड ही गौण खनिज संपत्ती मिळेल. पाण्याचे दुर्भिक्ष्य संपेल, गाव ओसाड पडणार नाहीत, स्थलांतर होणार नाही, शहरातील झोपडपट्ट्या फुगणार नाहीत, वाढणार नाहीत. संपूर्ण स्वावलंबी, आत्मनिर्भर अशी ही योजना असून कितीतरी लाभ या योजनेच्या अंतर्गत मिळतील. या पाण्यावर शेतकरी वर्षभर 2 ते 3 पिके घेऊ शकतील, गाव, शहर जलसमृध्द होईल.
चंदनपूरकर संरक्षण खात्यात आरेखक ड्राफ्टसमन् म्हणून 33 वर्षांची सव्हिर्स झाली आहे. व्ही आर एस घेऊन गेली 16 वर्षे सर्व भारतातील पाण्याच्या माहितीचे संकलन चालू ठेवले आहे. अगस्ति खंदक... योजना आखली आहे पण... ? आर्थिक सहाय्य मनुष्य बळ कोठून आणणार ?
तुम्ही एखाद्या चांगल्या संस्थेला ही योजना सविस्तरपणे सांगून मदत मिळवू शकला असतात ?
सकाळ वर्तमानपत्राने या योजनेची दखल घेऊ माझी मुलाखत प्रसिध्द केली होती.
तसेच भारत समर्थ व्यासपीठ (इंडिया जेव्हल्पमेंट कॉन्सिल) नावाची पुण्यामध्ये शुक्रवार पेठेत एक संस्था आहे. श्री.मुकुंद गोरे या संस्थेचे राष्ट्रीय समन्वयक आहेत. ही योजना त्यांना मान्य असून त्यांनी तसे पत्रकही काढले होते. इ.सन 2009 मध्ये विस्ताराने ही योजना मांडली होती पण पुढे काहीच नाही एखाद्या वेळेला मीच कमी पडलो असेन असे त्यांनी नम्रपणे सांगितले.
मी अगदी नम्रपणे माझा हेतू सांगितला इतकी चांगली योजना असून त्याची कार्यवाही कोणत्या अडचणींमुळे होऊ शकली नाही, मला फक्त जिज्ञासा आहे म्हणून विचारले आहे. मा. मुकुंद गोरे स्पष्टपणे, खणखणीतपणे मला फोनवर म्हणाले अहो, योजना चांगलीच आहे, प्राधान्य क्रम द्यायलाच हवा पण आमच्यापुढे अशाच प्राधान्य क्रमाच्या योजनांवर काम सुरू आहे. छोटे प्रकल्प करायचा म्हणले तरी 15 लाख रूपये खर्च आहे. त्यासाठी मनुष्य बळाची, आर्थिक बळाची आवश्यकता आहे. या संदर्भात आमच्या दोन बैठका झाल्या. मी सुई व्हायला तयार आहे पण मोत्यांना गुंफणारा दोरा तरी कोणीतरी व्हायला पाहिजे. नुसती थिअरॅटिकली माहिती असून चालत नाही त्यातली तज्ज्ञ माणसे हवीत आमचे प्रयत्न सुरूच आहेत हे काम नेटाने पुढे नेण्यासाठी या विचाराने झपाटलेला माणूस हवा आहे. त्यांचे बोलणे ऐकून एक क्षण मनात विचार आला की ज्येष्ठ नागरिक संघाने एखाद्या रोटरी क्लबच्या मदतीने असा पुढाकार का घेऊ नये.
गावोगावी शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना, एकत्र आणून स्वयंसहायता गट स्थापन करायला प्रवृत्त तर नक्की करता येईन ना ! प्रत्येक 32 हेक्टर जमिनीनंतर एक हेक्टर जमिनीवर एक याप्रमाणे गावात किमान 30 अगस्ति खंदक सामूहिक साठवण तलाव खोदावेत म्हणजे गाव जलसमृध्द, जल स्वावलंबी होईल. हे खंदक एकमेकांना तसेच जवळून वाहणाऱ्या ओढ्यांना आरंभी व शेवटी साखळी पध्दतीने जोडावेत. त्यामध्ये मत्स्योत्पादन, नौकाविहार, जलक्रिडा केंद्रे निर्माण करून उत्पन्न घेता येईल. तलावांचे भोवती सरोवर उद्याने विकसित करता येतील.
एक एक दृष्य डोळ्यासमोर येऊ लागले सगळीकडे सुजलाम् सुफलाम् सुबत्ता, सुख समृध्दीचे मनोहर दृष्य दिसू लागले पण हाय... हे सर्व कधी ? तर या माहितीचा, संशोधनाचा उपयोग तज्ज्ञ मंडळी, अनेक संस्था आर्थिक भार सांभाळून गावकरी, नागरिक यांच्या मदतीने प्रकल्प पुरे करतील तर, आपण सुध्दा दररोजचा एक तास याचा पाठपुरावा करण्यासाठी दिला तर नक्कीच उदंड होईल पाणी अशी अशा करायला काय हरकत आहे ?
चंदनपूरकरांना त्यांच्या या ध्यासाप्रमाणे अनेक चांगले छंद जडले आहेत. ऑफिसमध्ये सव्हिर्स करीत असतांना लायब्ररी सुरू केली होती. आजही दिवाळी अंक, चांगली पुस्तके कमिशन बेसिसवर आणून लोकांना कन्सेशन देऊन वाचायला देतात. चांगले उपयुक्त पुस्तक दिसले की 4 - 5 प्रति स्वत:च्या खर्चाने आणतात आणि वाचायला उत्सुक असणाऱ्यांना वाचायला देतात. महिन्याला या साठी 3 ते 4 हजार रूपये खर्च करतात. पण त्यांचा हा खर्च वारसा हक्काने जतन करणारा असा कोणीतरी हवा. वेगवेगळ्या संस्थांना पुस्तके देऊन टाकणे हा उपाय नाही असे मला प्रामाणिकपणे वाटले.
मला सुध्दा त्यांनी आज भी खरे है तालाब व गोट्या ही पुस्तके भेट म्हणून देऊन उदारतेचा पुरावा दिला. समाजामध्ये अशी अनमोल रत्न आहेत. त्यांचे मूल्य आपण ओळखले पाहिजे व त्यांनी अंगिकारलेले व्रत नुसते पहाण्यापेक्षा त्यापासून बोध घ्यायला हवा असे अगदी मनापासून, प्रकर्षाने मनात आले. त्यांच्या या ध्यासाला, छंदाला, मनस्वी वृत्तीला खरंच प्रणाम. त्यांचा प्रकल्प प्रयोग म्हणून तरी कोणीतरी प्रायोजक पुढे येईल व त्यांचे स्वप्न पूर्ण होईल अशी प्रार्थना परमेश्वराकडे करून त्यांना शुभेच्छा देऊन इथेच थांबते.