वाळवंटीकरण : महाराष्ट्राच्या दारात

Submitted by Hindi on Tue, 03/06/2018 - 15:04
Source
जलोपासना, दिवाळी 2017

१. भारत व महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमांचा तुलनात्मक विचार :


संप्रतीच्या महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक सीमांच्या क्षेत्र आकार मानांची तुलना भारताच्या भौगोलिक आकारमानाशी केल्यास, व त्यातील स्थळ वैशिष्ट्यांशीही केल्यास त्यात बरेच काही साम्य आढळते.

महाराष्ट्राचा पश्‍चिमेकडील सागर किनारा व भारताची दक्षिणोत्तर सीमा एकमेकास जोडल्यास, विशेषपणे जाणवते की महाराष्ट्र राज्य व उत्तरेकडील राज्या दरम्यानची भौगोलिक हद्द ही भारत देशाचे वायव्येकडील आंतरराष्ट्रीय हद्दीप्रमाणेच भासते.

उत्तरेकडील हिमालयीन उंचवट्यासारखेच महाराष्ट्राचे उत्तरे कडील सातपुडी डोंगर रांगांचे उंचवटे आहेत. हिमालयाचे पायथ्याशी गंगानदी मैदानींची (गँजेटीक प्लेन्स) तुलना तापी पूर्णा खोर्‍यांच्या मैदानी भागाशी संभवते.

महाराष्ट्रातील पूर्वेकडील भूभाग भारताच्या पूर्व व इशान्य प्रांतांची आठवण करून देतात. दक्षिण व अग्नेय (दक्षिण - पूर्व) महाराष्ट्राची भौगोलिक सीमा भारताचे दक्षिण व अग्नेय सीमेप्रमाणेच निमुळती आहे.

वरील परिच्छेदांत केलेल्या तुलनेत भारतातील राजस्थानच्या वाळवंटी भागाप्रमाणेच महाराष्ट्राच्या वायव्याच्या दिशेने, महाराष्ट्राच्या आंतरभागात वाळवंटीकरणांची प्रक्रिया होवू घातलेली आहे.

एकूणच,महाराष्ट्राचे हवामान विशेषत: पठारी भागाचे हवामान अपुर्‍या पावसाचे, कमी आद्रतेचे आणि दर ३-४ वर्षांनी अवर्षणाचे असते.

महाराष्ट्रातील एकूण बागायती जमिनीपैकी ७.१८ लाख हेक्टर जमिनी क्षारपड व पाणथळ झालेल्या आहेत (संदर्भ : दै. सकाळ २७.४.२०१०) या जमिनी १. पश्‍चिम महाराष्ट्र - सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे व नगर. २. मराठवाडा - औरंगाबाद, परभणी, नांदेड, ३. विदर्भ - अकोला, अमरावती, वर्धा या प्रमाणे विखुरलेल्या आहेत.

२. भूपृष्ठीय घटक विभागणी :


वर नमूद केलेल्या सर्व जिल्ह्यातून मुख्य, उपमुख्य नद्यांच्या सखल भागात क्षारांच्या साठवणींच्या नोंदी झालेल्या आहेत. सोबत, बदलते पर्जन्यमान, बाष्पीभवन व भूजलाच्या अतिवापरामुळे जमिनी क्षारपड झालेल्या आहेत. महाराष्ट्राची एकूण भौगोलिक स्थितीही तितकीच कारणीभूत आहे (तक्ता क्र. १)

३. भूपृष्ठीय व भूगर्भीय पाषाण समूह स्थिती :


महाराष्ट्राचे उत्तरेतील तापी - पूर्णा नदी खोर्‍यात वाळूकणांचे व गाळांचे पाषाण थर वगळता तसेच, पूर्व विदर्भातील दगडी कोळसा धारक पाषाण व लाव्हापाषाण थर समुहापेक्षाही भूशास्त्रीय इतिहासातील अत्यंत जुने पाषाण आहेत.

महाराष्ट्राचा उर्वरित ८१ टक्के भूभाग लाव्हापाषाणांचे विविध थर घटकांनी व्यापलेला आहे. लाव्हा पाषाणांचे मुख्यत: दोन प्रकार सर्वत्र आढळतात. विशेषत: Pahoehoe (पाहोही) प्रकारचे पाषाण हे संपूर्ण कोकण व ढोबळमानाने पुणे- औरंगाबाद - अजंठा - धार (मध्यप्रदेश) झाबुआ रेषेच्या उत्तरेकडील क्षेत्रात आढळतात. या रेषेच्या दक्षिणेस व अग्नेयकडील भूप्रदेशात AA (आ - आ) प्रकारच्या लाव्हापाषाणांचे एकावर एक अशा प्रकारची थर रचना असलेले पाषाणांचे थर समूह आहेत.

सर्व प्रकारचे लाव्हापाषाण घळयुक्त ज्वालामुखी थांबून थांबून बाहेर पडलेल्या लाव्हा रसांच्या गोठवण - थिज प्रक्रियाद्वारे निर्माण झालेले आहेत.

घळस्वरूपी ज्वालामुखींच्या उद्रेका दरम्यान कमीत कमी १-२ लाख वर्षांचा भूशास्त्रीय काळ (Geological Time Period) लोटलेला असतो. ही स्थिती भूजल उपलब्धी साठी अत्यंत अनुकूल असल्याचे आढळून आलेले आहे. लाव्हा पाषाण थर राशींच्या स्ट्रक्‍चरल निर्मितीपासून ते मागील ६० - ७० कोटी वर्षांच्या काळात या पाषाण थरांची प्रचंड झीज, विघटन व धुपणी होवून, त्यांच्या भूपृष्ठीय आकारमानात (Geomorphological) अमुलाग्र बदल झालेले आहेत. परिणामी, विशेष प्रकारचे भूपृष्ठीय घटक अस्तित्वात आलेले आहेत. (संदर्भ : तक्ता क्र १)

कठीण लाव्हापाषाण प्रकारांच्या थरराशी व त्यांच्यातील भूपृष्ठीय विविधता (जसे उंचवटे, पठार, उतार, ड्रेनेजधारक, व्हॅली (दरी) तसेच पाणीसाठवण वहन योग्य पाषाणगुण विशेषतेमुळे व प्रत्येक थराशी घटक निर्मिती दरम्यानच्या भूशास्त्रीय इतिहासामुळे महाराष्ट्रात लाव्हापाषाणांच्या उथळ मध्यम व खोल पाषाणांच्या थरात पाण्याचे स्त्रोत उपलब्ध झालेले आहेत.

या थरांतील पाणी (भूजल) विहीरी व बोअरवेलच्या माध्यमातून शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता होत आहे.

४. पर्जन्यविविधता : भूपृष्ठ पाणी आणि भूजल :


पश्‍चिमेकडील कोकण भूप्रदेशात नैऋत्य मान्सूनचे मोठे वरदान आहे. मात्र, सह्याद्री डोंगर रांगांचा उंबरठा ओलांडताना पावसाची उपलब्धता बर्‍याच प्रमाणात कमी होते. विशेषत: पश्‍चिम महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भूभाग, संपूर्ण मराठवाडा व पश्‍चिम विदर्भाचा भूप्रदेश पर्जन्य छायेत येत असल्याने, या भूप्रदेशात वारंवार ची अवर्षणप्रवणता निर्माण झालेली आहे.

विदर्भाचे अमरावती - यवतमाळ - वर्धाच्या पूर्वेस मान्सून पावसाचे प्रमाणात वाढ होते.

पर्जन्य पाण्याच्या जोरावर नदी - नाले - ओढे - ओघळ यांचे पात्रातून वहाणारे भूपृष्ठ पाणी फक्त पावसाळ्यातच दृष्टीस पडते. इतर वेळी सर्वप्रकारची वहळती (ड्रेनेजेस) कोरडीच असतात. या प्रकारच्या परिस्थितीत भूजलस्त्रोत निर्मिती शून्य स्तरावर आलेली असते.

पावसाळ्यात, शेतमातीच्या आवरणाखालील विघटित पाषाण, पाषाण थरांचे जोड सांधे, पाषाण फ्रॅक्‍चर / घळी, इ. च्या समन्वयाने निर्माण झालेल्या पाषाण पोकळी साठवणीत, शेताच्या उंचवट्यावरील भरणा (रिचार्ज) क्षेत्र विस्तारात जिरलेल्या /मुरलेल्या व पाण्याच्या संपृक्ततेनुसार (सॅच्युरेशनच्या टक्केवारी नुसार) विहीरीतून पाणी उपलब्ध होते.

उथळ स्तरावरील भूजल वहन बहुतांश पावसाच्या पाणी मात्रेवरच अवलंबून असते. याच एका कारणामुळे महाराष्ट्रातील लाव्हापाषाणव्याप्त भूप्रदेशात, विहीरी ऑक्टोबर महिना आखेरीस त्यांच्या कमाल पाणीपातळीच्या मर्यादेपर्यंत भरल्या जातात / किंवा विहीरी ओसंडून जातात.

उथळ स्तरावरील भूजलवहन भरणा (रिचार्ज) क्षेत्रातील टक्केवारी तसेच संबंधीत स्थळ परिसराच्या भूशास्त्रीय इतिहासाच्या कारणामुळे बहुतेक विहीरींनी (पाणी वापरा अथवा वापरू नका) प्रत्येक मार्च महिना अखेरीस तळ गाठलेला असतो.

५. महाराष्ट्र आणि बदलते हवामान :


पूर्वपार महाराष्ट्राचे हवामान (कोकण व पूर्वविदर्भ प्रदेश वगळता) अपुर्‍या पर्जन्यमानाचे, आद्रतेची कमतरता असणारे व मान्सून पर्जन्यादरम्यान वाढत्या उघडिपी चे असते.

पृथ्वीवरील हिमयुग (Ice Age) संपल्याच्या काळापासून सातत्याने, कोरडे (Arid) हवामान आजही अस्तित्वात आहे. या प्रकारच्या हवामानाचा परिणाम म्हणून अलेक्झांडर दि ग्रेट चे भारत आक्रमणाचे काळी, ख्रिस्तपूर्व (३५६-३२३) भारताचा हरित व वनराई असलेल्या भूप्रदेशात थर चे वाळवंटात रूपांतर झालेले आहे.

कोरड्या प्रकारच्या हवामानात निर्माण होणारी पर्जन्यातील घट, जागतिक तापमानवाढीमुळे उष्णतेत सातत्याने होणारी वाढ, भूपृष्ठावरील विविधता अपुरी भूजल साठवण, अतिप्रमाणातील भूजल उपसा या कारणांमुळे कोरड्या हवामानाची तीव्रता वाढत आहे.

सोबत हवामानाला वायुप्रदूषणाचा फटका बसत आहेच. एकूणच, जागतिक तापमान वाढीच्या परिणामामुळे / अनुषंगाने आगामी काळात पिण्याच्या व शेतीसाठीच्या पाण्याची उपलब्धता निश्‍चितपणे कमी किंवा काही भूप्रदेशातून नाहीशी होण्याची परिस्थिती निर्माण होत आहेच... बदलते हवामान व भूपृष्ठ निर्जलीकरण हे एक समीकरण होत आहे. विज्ञानाधारित योग्य व्यवस्थापन वापरून, परिस्थिती आटोक्यात आणण्यास विलंब झाल्यास महाराष्ट्राचे वाळवंटीकरण होणे फार दूर नाही.

६. महाराष्ट्रातील सद्यस्थिती :


मागील काही वर्षात एकूणच पाणलोटक्षेत्रात भूविज्ञान व भूजलशास्त्राचा वापर पाणलोट विकास कामात न झाल्याने, उपजावू शेतीचे, विशेषत: कोरडवाहू शेतीचे वाळवंटीकरण व ओलिताखालील शेत - शिवारात क्षारपण पाणथळपणा निर्माण होत आहे / झालेला आहे.

जलयुक्त शिवार योजनांतर्गत नदी - नाले, ओढे - ओहळ पात्र खोलीकरणात व रूंदीकरणात निसर्ग निर्मित पर्जन्यपाणी वहन स्थिती संपूर्णपणे विस्कटली गेलेली आहे. विस्कटली जात आहे. मोठ्या लांबी असलेल्या ओढा - नाला उतार पात्राचे, स्थान परत्वे, खोलीकरणामुळे व रूंदीकरणामुळे विविध प्रकारच्या लाव्हापाषाण थर राशी क्षेत्रात व संबंधीत परिसरात शेत माती खरवडून जाण्यासारखी स्थिती निर्माण झालेली आहे. जलयुक्त शिवार योजना फक्त पावसाळ्यातच पाण्याची मात्र इतर वेळी, विशेष: उन्हाळ्यात भरलेल्या गाळाची, कचरा / उकीरडा साठवणुकीची.

ओढे - नाले पात्रांचे खोलीकरण व रूंदीकरणासोबत असंख्य बांध - बंधारे घातल्याने पावसाळ्यात सर्वदूर पाण्याची डबकी, तर उन्हाळ्यात गाळ / कचर्‍यांचे थर निर्माण झाल्याने, पात्रा खालच्या भूजल भरणा थांबलेला आहे. परिणामी, उतार क्षेत्रात भूजल उपलब्धी खुंटीत झालेली आहे, होेत आहे.

शेत - शिवार भूमीतील विहीरींची खोली, खोलीकरण झालेल्या ओढे - नाले यांच्या पाणीपातळीच्या वरच राहिल्याने, विहीरींना कोणत्याच प्रकारे फायदा झालेला नाही - होत नाही.

शेत - तळी योजना प्रत्यक्षात शेत- शिवारातील भरणा (रिचार्ज) क्षेत्र साठवण (स्टोअरेज ) क्षेत्र व निचरा (डिसचार्ज) क्षेत्र दरम्यानचे भूजल वहनास व विहीरपाणी उपलब्धी खंडित करणारी योजना आहे.

७. सारांश :


१. सह्याद्री डोंगर रांगांच्या पूर्वेकडील अवर्षण प्रवण क्षेत्रातील कोरडवाहूंचे वाळवंटीकरण सुरू झालेले आहे. ढोबळमानाने, महाराष्ट्राच्या ८२ टक्के कोरडवाहूंचे क्षेत्रात भूजल उपलब्धीच्या वानवेंमुळे हा भूप्रदेश वाळवंट सदृष्यच आहे. हे वाळवंट पाण्याअभावी ओलित क्षेत्रातील भू भागात पसरणे शक्य आहे. सध्याचे ओलिताखालील क्षेत्रातील क्षारपाड व पाणथळ भूभाग वाळवंटाचाच एक भू भाग आहे.

२. संप्रती, भूपृष्ठावरील पाणी व भूजलविकासाची, संवर्धनाची विकास कामे भूशास्त्र व भूजल शास्त्रात प्रदीर्घ अनुभव नसलेल्या व्यक्ती / संस्थाद्वारे कार्यान्वित होत असल्याने आजपर्यंत कोणताही पाणलोट क्षेत्र शाश्‍वत पाणी धारक झालेला नाही.

३. उथळ स्तरावरील भूजलवहन संकल्पेनुसार, पर्जन्य पाण्याचा भरणा (रिचार्ज) क्षेत्रातून साठवण (स्टोरेज) क्षेत्रात व क्रमश: साठवण क्षेत्रातून निचरा (डिसचार्ज) क्षेत्रात येवून नंतर निम्न (लोअर) क्षेत्रातून वहाण्याऐवजी संप्रेतीची सर्व विकास कामे भूपृष्ठ पाण्याच्या व भूजलाच्या नाशास कारणीभूत झालेली आहेत, होत आहेत.

४. नाला खोदाई, सिमेंट बंधारे, शेत - तळींची संख्या जसजशी वाढत जातील, तस तसे भूजल वहन अडचणीत येवून, जागतिक तापमान वाढीत उथळ स्तरावरचे भूजलाचा ( म्हणजे वेडोज झोन ते पाणी पातळी दरम्यानचे पाणी) भाग कोरडा होवून वाळवंटीकरणाची प्रक्रिया गतीमान होत आहे. वस्तूत: अधिक पाणी उपलब्धी साठीची सर्व विकासाची कामेच, आहे त्या पाण्याची उपलब्धी घटवित आहेत .

लेखकाच्या मते :


वाढीव पाणी उपलब्धी, पाण्याचे संवर्धन, यासाठी कोरडवाहू शेत उंचवटा ते शेत उतार व नंतरच्या उताराच्या शेवटास असलेल्या ड्रेनेज दरम्यानच्या भूपृष्ठीय साखळीतील भूजल भरणा - साठवण - निचरा क्षेत्रामध्ये (भूजल शास्त्राचा आधार घेवून) अस्तित्वात असलेल्या वॉटर फिल्ड विकास निर्मिती प्रकल्पाची कामे राबविणे महत्वाचे आहे... नाहीतर.... निसर्ग निर्मित क्षारपड पूर्णा नदी खोर्‍याप्रमाणे, मनुष्य निर्मित खार्‍या पाण्यासोबत भूगर्भातील पाणीपातळी खालवल्याने नागपूर अमरावती जिल्ह्यातील ड्रायझोन सारखे ड्राय झोन इतरत्र निर्माण होवून वाळवंटीकरणचा (निसर्ग व मानव निर्मित) कार्यान्वित होतच राहणार आहे.

येणार्‍या काही दशकात सततच्या जागतिक तापमान वाढीत उत्तरेतील हिमखंडाचे वितळण्याने समुद्र पाणीपातळी वाढताच सह्याद्रीचा संरक्षण देणारा उंचवटा कमी होवून, पर्जन्य छायेच्या भूप्रदेशात वाळवंटीकरणाचा वेग वाढण्याचा अंदाज आहे.

श्री. बी.जी. ढोकरीकर - ०२० - २४३५२९०९