वायब्रंट औद्योगिक वसाहतीची पाणीदार कामगिरी

Submitted by Hindi on Wed, 08/09/2017 - 16:50
Source
जलसंवाद, मे 2017

भूजल पातळीत वाढ तर झालीच पण मुख्य म्हणजे जमीनीवरून वाहणार्‍या पाण्याचे प्रदुषण टळले. तुलनेने शुध्द पाणी जमीनीत झिरपले. एकत्रित प्रयत्न केल्यास कमी खर्चात अंत्यत साध्यापध्दतीने अशाप्रकारे पाण्यावर चांगले काम करता येऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. जे इतर ठिकाणीही सहज अंमलात आणल्या जाऊ शकते.

औरंगाबादेतील वाळूज औद्योगिक वसाहत ही महाराष्ट्रातील एक वायब्रंट’ औद्योगिक वसाहत समजली जाते. साधारणतः अडीच दशकांपूर्वी या वसाहतीचा विकास सुरू झाला. तो आजतागायत सुरूच आहे. सुरूवातीच्या काळात येथे सुरू झालेल्या उद्योगांचे आता वटवृक्ष झालेत. काहींनी विस्तार केला. काही देशविदेशात पोचले. या औद्योगिक वसाहतीची गणना महाराष्ट्रातील पहिल्या पाच आणि भारतातील पहिल्या पंचवीस औद्योगिक वसाहतीत होते. वाळूजला एकूण सुमारे तीन हजारपेक्षा जास्त औद्योगिक व व्यापारी आस्थापने आहेत. वाळूज औद्योगिक वसाहतीचे वेगळेपण सांगायचे झाल्यास या वसाहतीने नव उद्योजक घडविले. पहिल्या पिढीतील उद्योजकांचे प्रमाण लक्षणीय व फार मोठे आहे. या परिसरात रोज सुमारे दोन लाख लोकं आणि सहा हजार वाहनांचा वावर असतो.

पहिल्या पिढीतील उद्योजकांचे प्रमाण मोठे असल्यामुळे या औद्योगिक वसाहतीने सामुदायीक विचारांनी आपले वेगळेपण नेहमीच सिध्द केले आहे. कुठलीही नवीन व विकासात्मक बाब करायची झाल्यास त्याकडे सामुदायीक पध्दतीने बघीतले जाते. काही महत्वाचे उदाहरणे द्यायची झाल्यास, या औद्योगिक वसाहतीत राष्ट्रीय पातळीवर नावाजलेला तसेच ८४ कोटी रुपये गुंतवणुकीतून उभारलेला ऑटो क्लस्टर आहे. या क्लस्टरच्या उभारणीत याच भागातील लघु व मध्यम उद्योजकांचे सामुदायीक प्रयत्न आहेत. ही एकत्रित येण्याची प्रेरणा केवळ औद्योगिक कारणांपुरतीच मर्यादीत नठेवता पर्यावरणवर सारख्या अगदी महत्वाच्या मुद्यावरही याठिकाणी चांगल्या प्रकारे काम झालेले आहे. या औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या संघटना, सामाजिक संघटना आणि सरकारी यंत्रणेने एकत्रित येत मराठवाडा एन्व्हॉर्मेंट केअर क्लस्टर’ची स्थापना केली. या उपक्रमातून औद्योगिक वसाहतीत दहा हजार लोकांनी एकत्र येऊन स्वच्छतेची शपथ घेतली. या उपक्रमाच्या माध्यमातून वसाहतीमध्ये तब्बल २,१०० वाहन भरतील ऐवढ्या मोठ्या प्रमाणातील घनकचर्‍याची विल्हेवाट लावण्यात आली. एवढ्यावरच न थांबता या औद्योगिक वसाहतीमध्ये ५० किलोमीटर लांबीच्या अंतर्गत रस्त्यांच्या दुर्तफा ८० हजार झाडे लावली गेली. त्यांचे संगोपन केले जाते. अनेकांचे वाढदिवस हे वृक्षारोपणानेच साजरे झालेत.

याच सामुदायीक विचारांनी प्रेरीत होऊन पाण्याच्या पुर्नभरणावर काम करण्याचा निर्धार करण्यात आला. या औद्योगिक वसाहतीत एका सेक्टरमध्ये चार एकरांचा ग्रीन झोन आहे. या ग्रीन झोनमध्ये मोठे लवण असलेला भाग पहायला मिळतो. सुमारे चाळीस एकराच्या लाभक्षेत्रातील जमा झालेले पावसाचे पाणी या या भागातून नाल्याद्वारे वाहून जायचे. हे पाणी जमिनीतच जिरविण्याचा आणि जलपुनर्भरणाचा अनोखा प्रयोग करण्याचा निर्णय उद्योजकांनी घेतला. उद्योजकांनी एकत्र येत पावसाच्या पाण्याच्या पुनर्भरणासाठी एक योजना आखली. या लवण असलेल्या भागामध्ये साठ कंपन्यांनी एकत्र येऊन ६० शोष खड्डे तयार केले. प्रत्येक कंपनीने एक शोष खड्डा दत्तक घेतला. त्यासाठी लागणारा खर्च दिला. या उपक्रमातून सुमारे दिड कोटी लिटर पाण्याचे पुनर्भरण झाले. गेल्यावर्षी यावर काम करण्यात आले. यंदा उन्हाळ्यातही या भागातीत जलपातळी टिकून आहे. भूजल पातळीत वाढ तर झालीच पण मुख्य म्हणजे जमीनीवरून वाहणार्‍या पाण्याचे प्रदुषण टळले. तुलनेने शुध्द पाणी जमीनीत झिरपले. एकत्रित प्रयत्न केल्यास कमी खर्चात अंत्यत साध्यापध्दतीने अशाप्रकारे पाण्यावर चांगले काम करता येऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. जे इतर ठिकाणीही सहज अंमलात आणल्या जाऊ शकते.

श्री. उमेश दाशरथी, व्यवस्थापकीय संचालक, ऋचा ग्रुप