पाण्याच्या शुध्दीकरणाचे सोपे उपाय

Submitted by Hindi on Thu, 06/16/2016 - 13:05
Source
जल संवाद

पाण्याची निर्मिती करण्याची पध्दत अजून प्रत्यक्षात आली नाही. पण निसर्गाने दिलेल्या पाण्याचे रक्षण न करता आपण दूषित करत आहोत त्यावर उपाय करणे जरूरीचे आहे. नदीच्या पाण्यात सोडण्यात येणारे सांडपाणी, प्रक्रिया न करता सोडल्याने आपण चांगले पाणी प्रदूषित करत आहोत. शास्त्रज्ञांनी संशोधनात्मक अभ्यासातून असे दाखवून दिले आहे की प्रत्येक मनुष्य सांडपाण्यामध्ये दररोज 17 ग्रॅम्स केमिकल्स टाकून पाण्याचे प्रदूषण करतो.अशाप्रकारे संपूर्ण शहरातून येणारे सांडपाणी नदीतील चांगले पाणी प्रदूषित करत असते. आधुनिक पध्दतीच्या रहाणीमानात, स्वच्छतेच्या अयोग्य पध्दतीतून अनेक प्रकारची घातक रसायने वापरली जातात.

प्रथम आपण करीत असलेल्या कार्याबद्दल आपले आभार. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाविषयी सर्वांगानी चर्चा, लिखाण, लोकजागृतीचे कार्य चालू आहे. दुर्दैवाने या गोष्टी कृतीत आणण्याचे काम व जबाबदारी सध्याच्या बेजबाबदार सरकारी यंत्रणेकडे नाही. सर्वच ठिकाणी जसे भ्रष्टाचाराला प्राधान्य आहे. त्याप्रमाणे ते पाण्याच्या क्षेत्रात भरपूर अनुभवास येत आहे. सर्वसामान्य जनतेला त्रास देऊन त्यांचे मन दैनंदिन प्रश्नात गुंतवून ठेऊन कृत्रीम टंचाई व अडवणूक होत असल्याच्या भयंकर अनुभव लोकशाहीत येत आहे हीच गोष्ट गंभीर आहे.

असे असले तरी समाज जागृती सतत चालू आहे. कारण नवीन पिढीला प्रश्नांची योग्य बाजू समाजावून दिली तर ही नवीन पिढी प्रश्न सोडविण्याचे नवनवीन उपाय व सुधारीत व्यवस्था निर्माण करू शकेल. डोळस विज्ञान या आमच्या संस्थेस सुदैवाने पर्यावरण तज्ञ व जेष्ठशास्त्रज्ञ डॉ.प्रमोद मोघे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही लोकजागृतीचे निरनिराळे उपक्रम करीत आहोत. त्यांनी दिलेल्या शास्त्रीय माहितीवर आधारीत पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरील काही उपाय व इतर काही मुद्दे मांडत आहे.

1. क्लोरिनयुक्त पाणी शरीराला धोकादायक :


खरेतर फक्त प्रमाणबध्द क्लोरिनचा वापर केलेले पाणी पिण्यास चालू शकते. पण प्रत्यक्षात तसे होत नाही. जादा क्लोरिनचा वापर आपल्याकडे होतो - त्यातून Trihalomethanes निर्माण होत नाही. उदा - क्लोरोफार्म, कार्बनटेट्राक्लोराईडस् ज्यामुळे कॅन्सर सारखे रोग माणसात निर्माण होऊ शकतात.

उपाय : आपल्या पाण्याला क्लोरिनचा वास येत असल्यास क्लोरिनचे प्रमाण पाण्यात जास्त आहे हे लक्षात घेऊन ते पाणी पिण्यायोग्य होण्यासाठी उकळून गार करून प्यावे.

2. पाणी पिण्यासाठी योग्य होण्यासाठी शुध्दीकरणाचे सोपे उपाय संशोधनातून पुढे आले आहेत :


पाणी शुध्द करण्यासाठी शेवग्याच्या शेंगाच्या बियांची पावडर वापरण्याच्या पध्दतीचा शोध 5 वर्षांपूर्वी लागला आहे. आपल्याकडे दक्षिण भारतात या पध्दतीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. (तुरटीचा वापर केल्यास तो शरीराला अपायकारक आहे हे सिध्द झाले आहे.

लवंगाच्या तेलाचे किंवा लिंबाच्या तेलाचे 4-5 थेेंब हंडाभर पाण्याचे शुध्दीकरण (निर्जंतुकीकरण) करू शकतात. लिंबाच्या रसाने तर कॉलऱ्याचे जंतूपण मरतात हे संशोधनातून सिध्द झाले आहे.

3. टंचाईग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून पुरवठा :


पाण्याच्या मूळ स्त्रोतापासून दूर असलेल्या लोकांपर्यंत पिण्याचे पाणी पोहचण्यासाठी रेल्वे, एस.टी. या सारख्या सार्वजनिक वहातूक व्यवस्थेचा अभ्यासपूर्वक वापर करून दुर्गम भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सोडवता येईल.

4. पाणी साठवण्याच्या सोयी व संशोधन :


पावसाच्या पाण्याची साठवणूक करण्याच्या सार्वजनिक व खाजगी ठिकाणच्या मोकळ्या जागांचा वापर कसा चांगल्या प्रकारे करता येईल यावर सतत संशोधन होण्याची गरज आहे.

5. शुध्द पाण्याचे रक्षण :


पाण्याची निर्मिती करण्याची पध्दत अजून प्रत्यक्षात आली नाही. पण निसर्गाने दिलेल्या पाण्याचे रक्षण न करता आपण दूषित करत आहोत त्यावर उपाय करणे जरूरीचे आहे.

नदीच्या पाण्यात सोडण्यात येणारे सांडपाणी, प्रक्रिया न करता सोडल्याने आपण चांगले पाणी प्रदूषित करत आहोत. शास्त्रज्ञांनी संशोधनात्मक अभ्यासातून असे दाखवून दिले आहे की प्रत्येक मनुष्य सांडपाण्यामध्ये दररोज 17 ग्रॅम्स केमिकल्स टाकून पाण्याचे प्रदूषण करतो.अशाप्रकारे संपूर्ण शहरातून येणारे सांडपाणी नदीतील चांगले पाणी प्रदूषित करत असते. आधुनिक पध्दतीच्या रहाणीमानात, स्वच्छतेच्या अयोग्य पध्दतीतून अनेक प्रकारची घातक रसायने वापरली जातात.

उपाय : प्रत्येकाने स्वच्छतेसाठी वापरत असलेल्या गोष्टींचा वापर निम्म्यापेक्षा कमी केल्यास हे प्रदूषण बऱ्याच प्रमाणात कमी होऊन हे सांडपाणी प्रक्रियेसाठी उपायोजना करता येईल. (उदा - टूथपेस्ट, साबण व केमिकल्सचा वापर 50 टक्के कमी करणे) Eco Friendly वस्तूंचा वापर.

6. पिण्याच्या पाण्याची गळती व अक्षम्य नुकसान :


इकडे पाण्याच्या बचतीसाठी लोकांना मार्गदर्शन करण्यास सर्वसामाजिक संस्था, नेते, शासकीय यंत्रणा, धडाकेबाज मोहिम आखतात. पण शासनाच्याच अयोग्य नियोजनातून होणारी सततची गळती व वारंवार फुटणाऱ्या वाहिन्यांतून प्रचंड प्रमाणात वाया जाणारे पाणी यामुळे प्रचंड नुकसान होत आहे.

याबाबत न्यायालयाने देखील सरकारी यंत्रणेची कानउघाडणी केली आहे. काही ठिकाणी न्यायालयात द्याव्या लागणाऱ्या हिशोबात पाण्याची 30 टक्के गळती झाल्याचे निदर्शनास आले आहे.

अशा गंभीर बाबीबाबत नागरिकांची सतत जागृती असल्याशिवाय कठोर उपाय योजले जाणार नाहीत. वाहिन्यांची देखभाल, दुरूस्ती, वेळेत व योग्य पध्दतीने सतत चालू ठेवल्यास पिण्याचे पाणी वाया जाणार नाही.

7. वीज निर्मिती नंतर समुद्रात सोडले जाणाऱ्या गोड पाण्याबद्दलही योग्य कृती केल्यास पाण्याचे प्रचंड नुकसान थांबेल.

8. कृती कार्यक्रमांना युध्दपातळीवर राबवून पिण्याच्या पाण्याचे नियोजन 12 महिने केल्यास फक्त उन्हाळ्यात कोरड्या विहिरींकडे, तळ्यांकडे व नदीकडे पाहून आलेल्या स्मशान वैराग्याने पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे पहाण्याचे दुर्दैव आपल्यावर ओढवणार नाही.

श्री.शाम जोशी, पुणे